डोंबिवलीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या काटई नाका येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जलवाहिनी गुरूवारी सकाळी फुटली. वाहिनी फुटताच त्यामधून निघालेल्या पाण्याचा वेग इतका जबरदस्त होता की याच भागातील टोलनाका परिसरातील काही दुचाकी वाहने वाहून गेली तर चारचाकी वाहनांमध्ये पाणी शिरले. दरम्यान, ठाणे, नवी मुंबईला होणाऱ्या पाणी पुरवठय़ावर शुक्रवारी परिणाम होणार असून मुंब्रा, दिवा, कळवा व आजूबाजूच्या परिसराला पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले.
तानसा पाणी पुरवठा प्रकल्पाची जलवाहिनी बुधवारी भिवंडी परिसरात फुटल्यामुळे मुंबई तसेच ठाण्यातील काही परिसराचा पाणी पुरवठा गुरुवारी खंडीत झाला. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील लुईसवाडी, पाचपाखाडी, गुरुकूल परिसरातील अनेक वसाहतींमध्ये मागील ४० तासांपासून पाणी येत नसल्याच्या तक्रारी आहेत. ही घटना ताजी असताना गुरुवारी सकाळी काटई नाका येथील जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. ही वाहिनी कशामुळे फुटली याचे निश्चित कारण समजू शकले नाही, अशी माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता नितीन वानखडे यांनी दिली.
काटई गावाजवळ  जलवाहिनी फुटल्यामुळे मुंब्रावासियांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, नवी मुंबई परिसरातील काही गावठाणांमध्ये यामुळे कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, अशी माहिती महापालिकेतील सुत्रांनी
 दिली.

Story img Loader