मीरा-भाईंदरला दिलासा; लोकसंख्येच्या प्रमाणात समान पाणीवाटप

ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेला दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या कोटय़ात कपात केली जाण्याची शक्यता असून, मीरा-भाईंदर महापालिकेला पाण्याचा कोटा वाढवून दिला जाणार आहे. ठाणे जिल्ह्य़ातील महापालिकांना असमान पाणीवाटप होत असल्याने त्यात सुसूत्रता आणण्याचे निर्देश जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात पाणीवाटप सूत्राची अंमलबजावणी करण्याचे आदेश पुढील आठ-दहा दिवसांत दिले जातील, असे जलसंपदा विभागातील उच्चपदस्थांनी सांगितले.

यंदा राज्यातील सर्वच विभागांत पाणीटंचाई असून, केवळ मुंबई व पुणे शहरातील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होत आहे. ठाणे जिल्ह्य़ातील कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर यासह महापालिका व नगरपालिकांना वेगवेगळ्या धरणांमधून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणीपुरवठा केला जातो. जिल्ह्य़ातील धरणे व प्रकल्पांमधील साठय़ाचा आढावा घेऊन ते जुलैपर्यंत पुरेल, अशा पद्धतीने पाणीवितरणाचे नियोजन करावे, पिण्यासाठी साठा राखून ठेवला जावा, असे आदेश जलसंपदा विभागाने दिले आहेत. सध्या ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्राला प्रमाणित मानकापेक्षा अधिक पाणीपुरवठा केला जात आहे. दरडोई सुमारे ३०० लिटरपेक्षा अधिक पाणी दिले जाते. त्या तुलनेत मीरा-भाईंदरला कमी पाणी दिले जात असल्याची तक्रार आहे. तेथे दरडोई केवळ ९० ते १०० लिटर्स पाणी पुरविले जाते. त्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये तीव्र पाणीटंचाई असून, तेथील लोकप्रतिनिधींनी असमान पाणीवाटप होत असल्याची तक्रार सरकारकडे केली आहे.

पाण्याचे असमान वाटप..

  •  ठाणे, नवी मुंबईत प्रमाणित मानकापेक्षा अधिक पाणीपुरवठा. दरडोई सुमारे ३०० लिटरपेक्षा अधिक पाणी
  •  मीरा-भाईंदरला कमी पाणीपुरवठा. दरडोई केवळ ९० ते १०० लिटर पाणी. मानकानुसार शहरात दरडोई १५० लिटर पाणी पुरविणे आवश्यक
  • उपलब्ध साठय़ाचा अंदाज घेऊन महापालिकांना समान पाणीवाटपाचे सूत्र आखून देणार

कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद

कल्याण-डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील उपलब्ध पाणीसाठय़ात घट होत असल्याने, लघु पाटबंधारे विभागाने कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा यापुढे तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण पूर्व भागाचा पाणीपुरवठा यापुढे सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी बंद राहणार आहे. कल्याण पश्चिम व डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी बंद ठेवण्यात येणार आहे. २७ गाव व एमआयडीसी विभागाचा पाणीपुरवठा बुधवारी संध्याकाळी सहा ते शनिवारी सकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येईल.

Story img Loader