मुंबई : केंद्र सरकारच्या भूजल मंडळाने प्रसिद्ध केलेल्या ‘वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल २०२४’ नुसार राज्यातील सात जिल्ह्यांमधून नमुना घेतलेल्या ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील या सात जिल्ह्यांत पाण्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण धोकादायक पातळीपेक्षाही जास्त असल्याचे दिसून आले आहे. विधान परिषदेत मिलिंद नार्वेकर, सुनील शिंदे, डॉ. प्रज्ञा सातव, अभिजीत वंजारी आदींनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे, केंद्र सरकारच्या भूजल मंडळाने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल २०२४ नुसार राज्यातील ५६० पाण्याचे नमुने ‘नायट्रेट’बाधित आढळून आले आहेत. विदर्भातील वर्धा, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ तसेच मराठवाड्यातील नांदेड, बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगावात तपासणी केलेल्या ४३१ पैकी २१९ नमुने ‘नायट्रेट’बाधित आढळून आले आहेत. काही ठिकाणच्या नमुन्यांत नायट्रेटचे प्रमाण धोकादायक पातळीपेक्षाही अधिक दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने निश्चित केलेल्या ‘बीआयएस’ निकषांनुसार ४५ मिली ग्रॅम प्रतिलिटरपर्यंत नायट्रेटचे प्रमाण असेल तर पाणी पिण्यास योग्य आहे. त्यापेक्षा अधिक नायट्रेटचे प्रमाण असेल तर पाणी पिण्यास अयोग्य आहे. नायट्रेटचे प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
नायट्रेटचे प्रमाण का वाढते?
नायट्रेटयुक्त रासायनिक खते, औषधांचा पिकांवर अतिवापर, औद्योगिक आणि शहरी प्रदूषण, जमीन वापरातील बदल, जंगलतोड, वायू प्रदूषण, सेप्टिक प्रणालीची अकार्यक्षमता व गळती, भूगर्भातील नैसर्गिक बदल, सांडपाण्याचे गैरव्यवस्थापन आदी कारणांमुळे भूजलात नायट्रेटचे प्रमाण वाढते.
नांदेडमध्ये गभीर स्थिती
राज्य सरकारच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या २०२४-२५च्या आकडेवारीनुसार सात जिल्ह्यांतील पाण्याच्या नमुन्यांत नायट्रेटचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. परंतु, नांदेडमध्ये सर्वात भीषण स्थिती आहे. नांदेडमध्ये ३,८७७ पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २,१९० पाण्याच्या नमुन्यात नायट्रेटचे प्रमाण धोकादायक पातळीपेक्षाही जास्त आहे.