राज्यातील पाणीटंचाईची तीव्रता वाढत असून डिसेंबर महिना सुरू होण्याआधीच ७८३ गावे आणि ३५५१ वाडय़ावस्त्यांना ११३० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत केवळ ५९ गावांना ५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. राज्यात सध्या सर्वाधिक ३८४ टँकर पुणे विभागात सुरू आहेत.
यंदा कमी पाऊस झाल्याने हिवाळय़ातच टंचाईमुळे पाणी तापू लागले आहे. राज्यातील पाणी प्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ ५९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत तो ७२ टक्के होता. पाणीसाठा कमी असल्याने अनेक मोठय़ा शहरांतही पाणीकपात सुरू झाली आहे. ग्रामीण भागात तर परिस्थिती आणखीच वाईट आहे. त्यामुळे पाणीपुरवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात टँकर वापरण्यात येत आहेत. सध्या मराठवाडय़ातील पाणीप्रश्न चिघळला असला तरी टँकरची सर्वाधिक संख्या पश्चिम महाराष्ट्रात आहे. तर मराठवाडा दुसऱ्या क्रमांकावर आहे. पश्चिम महाराष्ट्रात ३८४ गावे आणि २६४० वाडय़ावस्त्यांना ५७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्याखालोखाल मराठवाडय़ात १६३ गावे आणि ८१ वाडय़ावस्त्यांना ३०७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
नाशिक विभाग तिसऱ्या क्रमांकावर असून तेथे २२५ गावे आणि ८३० वाडय़ावस्त्यांना २३६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अमरावती विभागात सर्वात कमी ११ गावांना १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तर ठाणे व नागपूर विभागात एकही टँकर सुरू नाही.

Story img Loader