मुंबई : घाटकोपरवासियांना या आठवड्यात दुसऱ्यांदा पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. घाटकोपर येथील आर बी मेहता मार्ग येथील जलवाहिनीची बुधवारी मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाली. तिच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी ६ मार्च रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी घाटकोपर पूर्व विभागातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी ९ ते रात्री ९ असे बारा तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

घाटकोपर पूर्व येथील, एमआयसीएल प्रोजेक्टच्या समोर, आर बी मेहता मार्ग, येथे ७५० मिमी व्यासाच्या जल वाहिनीची गळती होत असल्याचे बुधवारी आढळून आले. तिच्या दुरूस्तीचे काम पालिकेच्या जल अभियंता विभागाने हाती घेतले आहे. बुधवारी सकाळी घाटकोपर अंधेरी लिंक रस्ता, मराठी विद्यालयासमोर ६०० मिमी व्यासाच्या स्थलांतरित जलवाहिनीचे जोडकाम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे ६ मार्च रोजी सकाळी ९:०० वाजल्यापासून रात्री ९:०० वाजेपर्यंत घाटकोपर पूर्व विभागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल. ही कामे पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी दिली.

महानगरपालिकेच्यावतीने उपरोक्त विभागातील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे व दुरूस्ती काळात सहकार्य करण्याचे आवाहन जल अभियंता विभागाने केले आहे.दरम्यान, गेल्या आठवड्यात २८ फेब्रुवारी रोजी पवई व्हेंचुरी येथील १८०० मिमीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची गळती होत असल्याने घाटकोपर जलाशयास होणारा पाणीपुरवठा पूर्णत: बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे १ मार्च रोजी कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर येथील काही भागातील पाणी पुरवठा १५ तास बंद ठेवावा लागला होता. त्यानंतर आता चारच दिवसात या भागात दुसरी गळती आढळून आल्यामुळे पुन्हा एकदा घाटकोपरवासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

Story img Loader