मुंबई : मुंबई आणि उपनगरात अधूनमधून पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत, तसाच पाऊस धरणक्षेत्रातही पडतो आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात रोज थोडीथोडी वाढ होते आहे. रविवारी सातही धरणात मिळून २३ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. हा पाणीसाठा पुढचे दोन अडीच महिने पुरेल इतका आहे.
हेही वाचा >>> मुंबई : चुनाभट्टी येथे सिमेंट मिक्सर टँकरची पाच वाहनांना धडक, पाच ते सहाजण गंभीर जखमी
मुंबईत गेल्या काही दिवसापासून पाऊस पडत असला तरी ५० मिमीच्या आतच पावसाची नोंद होते आहे. धरणक्षेत्रातही तितकाच पाऊस पडतो आहे. अद्याप मुसळधार पाऊस धरण परिसरातही पडलेला नाही. मात्र मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठ्यात दररोज वाढ होते आहे. पावसाबरोबरच जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यामुळे पाणीसाठा वाढतो आहे. मात्र अजूनही गेल्यावर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमीच आहे.
उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सात धरणातून मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्षलीटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. हे तलाव पूर्ण भरलेले असतात तेव्हा सातही तलावातील पाणीसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर इतका असतो. सध्या सातही धरणात मिळून ३ लाख ३४ हजार ५२९ दशलक्षलीटर पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा पुढचे केवळ दोन महिने पुरेल इतका आहे. सातही धरणातील पाणीसाठा १४ लाख ४७ हजार दशलक्षलीटर पोहोचल्यानंतर मुंबईकरांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य होते. १ ऑक्टोबरला सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरले असले तर वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहतो. त्यामुळे पुढचे तीन महिने धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडणे आवश्यक आहे.
हेही वाचा >>> मुंबई: १४७ गुंतवणूकदारांची सुमारे १८ कोटींची फसवणूक; निर्यातदार कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा
दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा
९ जुलै २०२३……३ लाख ३४ हजार ५२९ दशलक्षलीटर…….२३.११ टक्के
९ जुलै २०२२……४ लाख १८ हजार १२९ दशलक्षलीटर……. २८.८९ टक्के
९ जुलै २०२१……२ लाख ६१ हजार ६४४ दशलक्षलीटर…….१८.०८ टक्के