पाणीटंचाईचे आगार ठरलेल्या कल्याण पूर्वेत शनिवारी मध्यरात्री पालिकेची आठ इंचाची जलवाहिनी तिसगाव नाका येथील कर्पेवाडी रस्त्यावर फुटली. रात्रभर शेकटो लिटर पाणी फुकट गेले. नागरिकांनी पालिकेत तक्रारी करूनही आठ तासांनंतरही दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा विभागाचा एकही कर्मचारी घटनास्थळी आला नाही.
सुट्टी असल्याने पालिका कर्मचाऱ्यांना रविवारीही वेळ मिळाला नाही. अखेर पालिकेत नागरिकांनी तक्रारींचा पाऊस पाडल्यानंतर पालिकेला जाग आली आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा भागातील विश्रांती निवास भागात चार दिवसांतून एकदा दोन तास पाणी येते. कोळसेवाडीतही हीच परिस्थिती आहे. महापौर कल्याणी पाटील या दाद देत नाहीत तर गेल्या अडीच वर्षांच्या काळात कल्याण पूर्वेतील नगरसेवकांनी सात ते आठ वेळा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणीटंचाई विषयावर सभा तहकुब्या मांडण्यापलीकडे काही केलेले नाही, अशी लोकांची तक्रार आहे.
कल्याण-डोंबिवली परिसरात गेले आठवडय़ापासून जलवाहिन्या फुटण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या शुक्रवारी एमआयडीसीची जलवाहिनी काटई येथे फुटल्याने डोंबिवलीचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद होता. शनिवारी देसले गाव येथे एमआयडीसीची जलवाहिनी फुटून दिवा, मुंब्रा भागाचा पाणीपुरवठा ठप्प होता. टिटवाळा येथे गेल्या आठवडय़ात मोहिली येथील जलवाहिनी फुटल्याने टिटवाळा परिसर कोरडा ठाण होता.