आठवडय़ाहून अधिक काळ दूषित पाणी ; बाटलीबंद पाण्याची विक्री तेजीत
मुंबईमधील चेंबूर गावठाण आणि साण्डू गार्डन परिसरात गेल्या आठवडय़ाहून अधिक काळ दरुगधीयुक्त पाणीपुरवठा होत असून रहिवासी हवालदिल झाले आहेत. पालिकेच्या एम-पश्चिम विभाग कार्यालयात अनेक वेळा तक्रार करूनही या समस्येवर उपाययोजना करण्यात पालिका सपशेल अपयशी ठरली आहे. पालिकेचे अधिकारी इमारतींमध्ये येणाऱ्या पाण्याची पाहणी करून ते दूषित असल्याचे प्रमाणपत्र देत आहेत. पण त्यावर तोडगा अद्यापही काढता आलेला नाही. हळूहळू या भागात आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिक संतप्त झाले असून पालिकेविरुद्ध सनदशीर मार्गाने लढा देण्याची तयारी रहिवाशांनी सुरू केली आहे. जलजन्य आजारांच्या भीतीमुळे महागडय़ा बाटलीबंद पाण्यावर तहान भागविण्याची वेळ या परिसरातील रहिवाशांवर आली असून बाटलीबंद पाण्याची विक्री तेजीत आली आहे.
गेल्या आठवडय़ाच्या सुरुवातीला चेंबूर गावठाण, साण्डू गार्डन परिसर आणि आसपासच्या विभागात दरुगधीयुक्त पाणीपुरवठा होऊ लागला होता. काही तरी तांत्रिक बाब असावी असा समज सुरुवातीला रहिवाशांचा झाला होता. मात्र नंतर पाण्याला मोठय़ा प्रमाणावर दरुगधी येऊ लागल्याने आणि पाण्यावर काळ्या रंगाचा तवंग दिसू लागल्याने हैराण झालेल्या रहिवाशांनी थेट पालिकेचे एम-पश्चिम कार्यालय गाठले. दूषित पाणीपुरवठय़ाबाबत अनेकांनी तक्रारी केल्या. पण हा प्रश्न सोडविण्यात पालिका अद्यापही अपयशी ठरली आहे. पालिकेच्या जलविभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे या परिसरातील रहिवासी कमालीचे संतापले आहेत. काही सोसायटय़ांमधील रहिवाशांनी पाण्याचे नमुने घेऊन ते खासगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. पाण्याच्या नमुन्यांच्या तपासणीचे अहवाल हाती येताच स्वच्छ पाणीपुरवठा करण्यास अपयशी ठरलेल्या पालिकेविरुद्ध सनदशीर मार्गाने लढा देण्याची तयारी काही रहिवाशांनी सुरू केली आहे. हा प्रश्न दोन दिवसात सोडविला नाही तर हेच दरुगधीयुक्त काळे पाणी जल विभागातील अधिकाऱ्यांना पाजण्यात येईल, असा इशाराही काही रहिवाशांना दिला आहे. गेल्या आठवडाभर दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याच्या शक्यतेने रहिवासी घाबरले आहेत. जलजन्य आजारांना बळी पडण्यापेक्षा पिण्यासाठी महागडय़ा बाटलीबंद पाण्याचा वापर रहिवाशांनी सुरू केला आहे. त्यामुळे या परिसरात बाटलीबंद पाण्याची विक्री तेजीत आली आहे. या प्रश्नाकडे प्रशासन फारशा गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे निवडणुकीत स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरठा करण्याचे वचन देणाऱ्या सत्ताधारी शिवसेना-भाजपलाही आपल्या वचननाम्याचा विसर पडल्याबद्दल रहिवाशांमध्ये संताप खदखदू लागला आहे.