भंडारवाडा टेकडी जलाशयाच्या जलवितरण व्यवस्थेतील गळतीच्या दुरुस्तीचे काम ९ डिसेंबर रोजी हाती घेण्यात येणार असल्याने ९ व १० डिसेंबर या कालावधीत दक्षिण मुंबईमधील काही विभागांमध्ये ५० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. जलविभागातर्फे हे काम ९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता सुरू करण्यात येणार असून ते १० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
त्यामुळे ए विभागातील नेव्हल डॉकयार्ड, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि आसपासचा परिसर, सेंट जॉर्ज रुग्णालय, पी. डिमेलो मार्ग आणि परिसर, बी विभागातील संपूर्ण परिसर, ई विभागातील मुंबई पोर्ट ट्रस्ट, नागपाडा, माझगाव, म्हातारपाखाडी, आंबेवाडी, तुळशीवाडी येथे पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. तसेच या कालावधीत ए, बी, सी, डी आणि ई विभागांतील अन्य विभागांमध्ये नेहमीपेक्षा कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तसेच या परिसरात ५० टक्के पाणीकपातीची शक्यताही पालिका अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. नागरिकांनी आदल्या दिवशी पुरेशा पाण्याचा साठा करून ठेवावा, तसेच पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

Story img Loader