लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : दादर पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानातून उडणाऱ्या धुळीमुळे आसपासच्या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील ३५ रिंगवेल विहिरींमधून उपलब्ध होणारे पाणी दररोज या मैदानावर फवारण्यात येत असून धुळीची समस्या सोडविण्यासाठी आणि मैदानावरील हिरवळ वाढवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. धुळीच्या समस्येवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक करून त्यांच्या सल्ल्याने प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णयही मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.

मुंबई महानगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये तुषार सिंचन प्रणाली प्रकल्प राबविण्यात आला असून या प्रकल्पामध्ये पर्जन्य जल पुनर्वापर (रेन वॉटर हार्वेस्टिंग) प्रणाली वापरून ३५ नवीन रिंग विहिरी तयार करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत मैदानामध्ये प्रतिदिन पाणी फवारण्याकरीता सुमारे २ लाख ९० हजार लिटर पाण्याची आवश्यकता असते. मैदानावरील धूळ प्रदूषण रोखून स्थानिक रहिवाशांची धुळीच्या त्रासातून सुटका करण्यासाठी मैदानातील ३५ रिंगवेलमधील पाणी संपूर्ण मैदानात फवारण्यात येत आहे. त्यासोबतच मैदानावरील हिरवळीचे आच्छादन वाढवण्यासाठी महानगरपालिकेतर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत.

आणखी वाचा-मुंबई: कूपर रुग्णालयामध्ये पिवळ्या तापाच्या लसीकरण केंद्राचे उद्या लोकार्पण

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी परिमंडळ २ चे उपायुक्त रमाकांत बिरादार यांना स्थानिक रहिवाशांची भेट घेऊन मैदानातील धूळ प्रदूषणाबाबत चर्चा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बिरादार यांनी शुक्रवारी स्थानिक रहिवाशांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तसेच महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. सदर मैदानातील लाल माती काढून टाकावी अशी विनंती रहिवाशांनी यावेळी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water spraying in shivaji park ground for dust settlement mumbai print news mrj