मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात मोसमी पाऊस ‘अधिकृतपणे’ सुरू झाला असला तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रांत दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. धरणांमध्ये मंगळवारी गेल्या तीन वर्षांतील नीचांकी, ५.६४ टक्के पाणी शिल्लक होते. त्यामुळे पुढील काही दिवस मुंबईकरांना पाणी जपूनच वापरावे लागणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी अशा सातही धरणांत मिळून ८१ हजार ६२३ दशलक्ष लिटर म्हणजेच ५.६४ टक्के पाणीसाठा आहे. गेले दोन-तीन दिवस मुंबईत रात्री चांगलाच पाऊस पडला असून काही भागांत पाणीही साचले. मात्र धरणे असलेल्या शहापूर तालुक्यात अगदीच तुरळक पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. मुंबईला दररोज ३,८०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. सरकारने महापालिकेला राखीव साठा वापरण्यास परवानगी दिल्यानंतर भातसा धरणातून एक लाख ३७ हजार दशलक्ष लिटर, तर ऊर्ध्व वैतरणा धरणातून ९१ हजार १३० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध झाले आहे. हे पाणी जुलैच्या अखेरपर्यंत पुरवावे लागेल.
महापालिकेचे दोन लिपीक एसीबीच्या जाळ्यात… कोणत्या कामासाठी घेतली लाच?
ठाणे जिल्ह्यावर कपातीची टांगती तलवार
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रातही अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. धरणांतील पाणीपातळीत घट होत असताना पावसाने दडी मारल्यामुळे ठाणे जिल्ह्यावरही पाणी कपातीची टांगती तलवार कायम आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली नसल्याने पेरण्याही खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात मुबलक पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. गेल्या दहा दिवसांत धरण क्षेत्र वगळून केवळ ११४ मिमी पाऊस झाला. सोमवारी केवळ ११.२ मिमी पावसाची नोंद झाली. जून महिन्याचा पहिला पंधरवडा संपत आला तरी पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही.
पाणीकपात कायम
राखीव साठ्यातील उपलब्ध पाणी अधिकाधिक काळ वापरता यावे या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेने ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. तसेच ठाणे, भिवंडी-निजामपूर महापालिका व इतर गावांना करण्यात येणाऱ्या पुरवठ्यातही १० टक्के कपात करण्यात आली आहे. जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत पाणीकपात लागू राहणार आहे.
© The Indian Express (P) Ltd