गेल्या वर्षीपेक्षा यंदा दुप्पट साठा

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रांत गेल्या काही दिवसांपासून अगदी तुरळक पाऊस पडत असला तरी सातही तलावांत मिळून सध्या ११ लाख १९ हजार ८१५  दशलक्ष लिटर म्हणजेच ७७.३७ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा दुपटीहून जास्त आहे. मुंबईकरांची पाण्याची चिंता कमी झाली असली तरी अद्याप तलावांतील साठय़ात २२ टक्के तूट आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात १७ जुलैपर्यंत अगदीच कमी पाऊस पडला होता. त्यामुळे पाणीकपात करावी लागते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर पडलेल्या पावसामुळे तलावांतील जलसाठय़ात भरघोस वाढ झाली. गेल्या वर्षीपेक्षा चांगला पाणीसाठा जमा झाला आहे. मात्र गेल्या आठवडय़ापासून तलाव क्षेत्रातही अगदी मोजकाच पाऊस पडत आहे. तरीही मातीतून झिरपत येणाऱ्या पाण्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होते आहे. मात्र येत्या दोन महिन्यांत २२ टक्के तूट भरून निघेल इतका पाऊस पडण्याची गरज आहे. गेल्या वर्षी २०२० मध्ये जुलैमध्ये पाणीसाठा वाढत नसल्यामुळे अखेर ऑगस्टमध्ये २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र ऑगस्टमध्ये चांगला पाऊस पडल्यानंतर २१ ऑगस्टला पाणीकपात १० टक्के करण्यात आली. तर २०१८ मध्ये पाणीसाठय़ात नऊ टक्के तूट राहिल्यामुळे वर्षभर १० टक्के कपात करण्यात आली होती.

मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करावा लागतो. सातही तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असतात तेव्हा

एकूण पाणीसाठा १४ लाख ४७

हजार ३६३ दशलक्ष लिटर

असतो. तलाव काठोकाठ भरलेले असतात तेव्हाच मुंबईला पूर्ण पाणीपुरवठा होऊ शकतो. तलावातील एकू ण पाणीसाठा हा ३१ जुलैपर्यंत पुरेल या दृष्टीने त्याचे पालिके च्या जल अभियंता खात्याद्वारे नियोजन के ले जाते.

३ ऑगस्ट २०२१ ११ लाख १९ हजार ८१५ दशलक्ष लिटर   ७७.३७%

३ ऑगस्ट २०२० पाच लाख दोन हजार २४२ दशलक्ष लिटर   ३४.७० %

३ ऑगस्ट २०१९ १३ लाख २४ हजार ८३१ दशलक्ष लिटर   ९१.५३%

Story img Loader