मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा निम्म्यावर आला आहे. वातावरणातील उष्मा वाढू लागल्याने पाणीसाठा पुढील तीन ते चार महिने पुरवावा लागणार आहे. हा पाणीसाठा सहा महिने पुरेल इतका असला तरी पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत असते, तसेच उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढते. त्यामुळे हे पाणी जुलै महिन्यापर्यंत पुरवावे लागणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात यंदा चांगला पाऊस पडला होता. उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी ही सातही धरणे ९० टक्क्यांपेक्षा अधिक भरली होती. सातही धरणातील पाणीसाठा सुमारे ९५ टक्क्यांपर्यंत गेला होता. या धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्षलीटर इतकी आहे. त्या तुलनेत सध्या सात धरणांत ७ लाख ३९ हजार ८३० दशलक्ष लीटर पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत अधिक आहे.
गेल्यावर्षी याच दिवशी ४५ टक्के पाणीसाठा होता. त्या आधी पाणीसाठा ५०.२५ टक्के होता. हा पाणीसाठा सध्या पुरेसा असला तरी प्रत्यक्षात मुंबईत अनेक ठिकाणी आतापासूनच पाण्याचा दाब कमी झाला आहे. त्यामुळे मुंबईच्या अनेक भागात पाणीटंचाई भेडसावते आहे. मुंबईत जून महिन्यात पावसाला सुरुवात होत असली तरी प्रत्यक्षात धरणक्षेत्रात जुलै महिन्यात मोठा पाऊस पडतो. पाण्याची मागणी उन्हाळ्यात वाढते. त्यामुळे हा पाणीसाठा जुलै महिन्यापर्यंत पुरवावा लागणार आहे.
धरणात किती पाणीसाठा?
उर्ध्व वैतरणा ७०.६७ टक्के
मोडकसागर १९.९१ टक्के
तानसा ४३.३५टक्के
मध्य वैतरणा ५०.९८ टक्के
भातसा ५१.७८ टक्के
विहार ५९.०३ टक्के
तुळशी ५६.१२ टक्के