मुंबई : गेले काही दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा वाढला असून सध्या सातही तलावांतील पाणीसाठा ८६.६७ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या सहा वर्षांतील हा या दिवशीचा सर्वाधिक साठा आहे. सातही तलावांमध्ये सध्या १२ लाख ५४ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही तलावांमध्ये सध्या ८६.६७ टक्के पाणीसाठा आहे. जूनमध्ये पाऊस न पडल्यामुळे पाणीसाठा ९ टक्क्यापर्यंत खालावला होता. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून कोसळणाऱ्या पावसामुळे पाणीसाठ्यात भरघोस वाढ झाली आहे. दोन वर्षांच्या तुलनेत खालावलेला पाणीसाठा गेल्या पंधरा दिवसात चांगलाच वाढला आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा तलावांमध्ये तिप्पट पाणीसाठा जमा झाला आहे. मोडक सागर, तानसा आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्यानंतर आता अन्य चार जलाशय ओसंडून वाहण्याच्या बेतात आहेत.
मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर इतकी आहे. पावसाळ्याचे चार महिने संपल्यानंतर ऑक्टोबरमध्ये पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात येतो. तलावांमध्ये पूर्ण क्षमतेने जलसाठा उपलब्ध असल्यास तर पाणी कपातीची आवश्यकता भासत नाही.