पावलस मुगुटमल
मुंबई, पुणे : मोसमी पावसाच्या हंगामाचा शेवटचा टप्पा सुरू होण्यापूर्वीच यंदा राज्यातील धरणांमध्ये गेल्या चार-पाच वर्षांतील सर्वाधिक उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही जलाशयांमध्ये सध्या ९७.०३ टक्के पाणीसाठा आहे.
राज्याच्या सर्वच भागांत सध्या पावसाने ओढ दिली असली, तरी संपूर्ण जुलै आणि ऑगस्टच्या पहिल्या टप्प्यामध्ये राज्याच्या बहुतांश भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली होती. सध्या राज्यात सरासरीच्या तुलनेत सुमारे २० टक्क्यांनी अधिक पावसाची नोंद झाली आहे. जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात आणि ऑगस्टच्या पहिल्या पंधरवडय़ात अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या काळात बहुतांश धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.
जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, यंदा राज्यातील मोठय़ा धरणांमधील एकूण पाणीसाठा ९१ टक्क्यांवर पोहोचला आहे. २०२१ मध्ये याच कालावधीत हा पाणीसाठा ७३ टक्क्यांच्या आसपास होता. २०२० मध्ये तो ७५ टक्के होता. त्यापूर्वीच्या दोन-तीन वर्षांच्या काळातही ऑगस्टच्या शेवटच्या टप्प्यात धरणांतील पाणीसाठा ९० टक्क्यांच्या पुढे गेला नव्हता. राज्यातील १४१ मोठे प्रकल्प, २५८ मध्यम प्रकल्प आणि इतर लघु प्रकल्प मिळूनही यंदाचा पाणीसाठा अधिक आहे. सर्व प्रकल्पांतील एकूण पाणीसाठा ८३ टक्क्यांच्या पुढे आहे. २०२१ आणि २०२० च्या तुलनेत तो २० टक्क्यांनी अधिक आहे. कोकण विभागात सध्या सर्वाधिक ९० टक्के, तर पुणे विभागात ८८ टक्क्यांहून अधिक पाणी जमा झाले आहे.
मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांची पाणी साठवण क्षमता साडेचौदा लाख दशलक्ष लिटर इतकी आहे. पावसाळय़ाचे चार महिने संपले की ऑक्टोबरमध्ये पाणीसाठय़ाचा आढावा घेतला जातो. यंदा ऑगस्टअखेरीसच ९७ टक्के पाणीसाठा जमा झाल्याने पाणीचिंता दूर झाली आहे.
तीन वर्षांतील जलसाठा
वर्ष (दशलक्ष लिटरमध्ये) टक्केवारी
२०२२ १४,०४,३७९ ९७.०३ टक्के
२०२१ १२,७६,४६८ ८८.१९ टक्के
२०२० १३,९६,८८१ ९६.५१ टक्के
मोठी धरणे काठोकाठ
महाराष्ट्रातील मोठी धरणे म्हणून ओळख असलेल्या कोयना, उजनी, जायकवाडी यंदा ऑगस्टमध्येच काठोकाठ भरली आहेत. जायकवाडी प्रकल्पात गतवर्षी या वेळेला ४१ टक्केच पाणी होते. यंदा ते ९८ टक्क्यांवर गेले आहे. कोयना प्रकल्पात गतवर्षी ८८ टक्के साठा होता, यंदा तो ९५ टक्क्यांपुढे गेला आहे. उजनी धरणात गतवर्षी केवळ ६२ टक्के पाणीसाठा होता. यंदा हे धरण १०० टक्के भरले आहे.