मुंबई: मुंबई महानगरपालिकेने पवई निम्नस्तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक १ व २ च्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या दुरुस्तीसाठी पावसाळा वगळता १३ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. कप्पा क्रमांक १ ची दुरुस्ती सोमवार, ६ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच कप्प्यातून पाणीपुरवठा केला जाणार असून कुर्ला पश्चिम परिसरातील काही भागांमध्ये ६ नोव्हेंबरपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. परिणामी, नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
कप्पा दुरूस्ती कामामुळे कुर्ला पश्चिम परिसरातील काही प्रभाग, तसेच उंचीवरील वस्तींमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अंधेरी पूर्व परिसरातील बामणदया पाडा, मारवा इस्टेट, अशोक टॉवर, उदय नगर, साकीनाका, घाटकोपर अंधेरी लिंक रोडवरील टिळक नगर, बामणदया पाडा, मारवा इस्टेट, अशोक टॉवर, उदय नगर, साकीनाका, कुर्ला – अंधेरी रस्त्यावरील जरी मरी, विजय नगर, एल.बी.एस. नगर, शास्त्री नगर, शेट्टीया नगर, सत्य नगर जलवाहिनी, वायर गल्ली, ३ नंबर खाडी या विभागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
जलाशयाच्या एकाच कप्प्यातून पाणीपुरवठा केला जात असल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता सदर कालावधीत पाण्याचा जपून वापर करावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.