मुंबई : मुंबईमधील काही विभागांमध्ये जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबईतील पूर्व भागात पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. या भागातील नागरिकांना तब्बल ४८ तास पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, घाटकोपर, कुर्ला, परेल, शिवडी या परिसरातील नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.
मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील काही विभागांमध्ये जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. याअंतर्गत मंगळवारी पश्चिम उपनगरात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर आता गुरुवार आणि शुक्रवारी मध्य मुंबईसह पूर्व उपनगरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
हेही वाचा – मुंबई जीवी : सर्व मृगांमध्ये देखणे चितळ
जलवाहिनी दुरुस्तीअंतर्गत ९०० मिलीमीटर व्यासाचे जलद्वार बदलण्याचे, तसेच ३०० ते १८०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील गळतीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे, गुरुवारी २ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजल्यापासून शुक्रवारी ३ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत एम (पूर्व), एम (पश्चिम), एन, एल, एफ (दक्षिण) आणि एफ (उत्तर) विभागांतील काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या काळात चेंबूर, गोवंडी, देवनार, मानखुर्द, घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला याबरोबरच परळ, वडाळा, नायगाव, शिवडी परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
हेही वाचा – मुंबई : ऑनलाईन फसवणुकीतील ९० टक्के रक्कम परत मिळविण्यात यश
महत्त्वाच्या रुग्णालय परिसरात पाणी नाही
केईएम रुग्णालय, टाटा, बाई जेरबाई वाडिया, एमजीएम रुग्णालय; भोईवाडा गाव, हाफकिन इन्स्टिट्यूट, गॅस कंपनी क्षेत्र येथील पाणीपुरवठाही खंडित केला जाणार आहे. पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.