मुंबई : मालाड (प.) येथील एवरशाईन नगरातील ९०० मिमी व्यासांच्या जलवाहिनीतून गळती होत असून महापालिकेच्या जलअभियंता विभागातर्फे गुरुवार, १२ डिसेंबर रोजी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामामुळे मालाड परिसरातील जनकल्याण नगर, अम्बोजवाडी, आझमी नगर भागात गुरुवारी रात्री १० ते शुक्रवारी सकाळी ८ दरम्यान पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आदल्या दिवशीच पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा. तसेच, पाणी जपून वापरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.