मुंबई : गेल्या आठवड्यात महानगरपालिकेने पवई अँकर ते मरोशी जलबोगदा दरम्यान नवीन २४०० मिलीमीटर व्यासाची तानसा जलवाहिनी कार्यान्वित केली. या कामासाठी ५ व ६ फेब्रुवारी रोजी मुंबईतील अनेक भागांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यानंतर बाधित परिसरातील पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्याचे महापालिकेने नियोजन केले होते. मात्र, आठवडा उलटून गेल्यांनतरही अंधेरीमधील चकाला परिसरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा झालेला नाही. अपुऱ्या आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. परिसरातील पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पवई अँकर ते मरोशी जलबोगदा दरम्यान नवीन तानसा जलवाहिनी जोडण्याची कार्यवाही ६ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाली. या जलवाहिनी जोडण्याच्या कामासाठी पालिकेच्या एस, एल, के पूर्व, एच पूर्व आणि जी उत्तर विभागांतील अनेक परिसराचा पाणीपुरवठा २ दिवस खंडित करण्यात आला होता. हे काम पूर्ण झाल्यांनतर बाधित परिसरांचा पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात येईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. चकाला परिसरातील काही भागांमध्ये अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होऊ लागला आहे. अवेळी होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे रहिवाशांची गैरसोय होत आहे. पाणीपुरवठा खंडित करण्यापूर्वी नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा होत होता. मात्र, व्हॉल्वचे काम पूर्ण झाल्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. रहिवाशांची गैरसोय लक्षात घेऊन महापालिकेने तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Story img Loader