लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : येत्या गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून अंधेरी व जोगेश्वरी भागातील पाणी पुरवठा १८ तासांसाठी बंद राहणार आहे. गुरुवारी १९ सप्टेंबरच्या रात्री ८ वाजल्यापासून ते शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर ४ ते ५ दिवस पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वेरावली जलाशय-२ येथे ७५० मिलीमीटर व्यासाच्या पार्ले वेसावे (वर्सोवा) निगमवाहिनीवरील चार झडपा बदलण्यात येणार आहेत. गुरुवारी १९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपासून दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेदरम्यान हे काम केले जाणार आहे. त्यामुळे या कालावधीदरम्यान अंधेरी व जोगेश्वरीचा समावेश असलेल्या के पूर्व आणि के पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
आणखी वाचा-खासगी आयुष महाविद्यालयांमधील प्रवेश शुल्कात पाच पट वाढ
महाकाली मार्ग, पूनम नगर, गोनी नगर, तक्षशिला मार्ग, एमएमआरडीए वसाहत, दुर्गा नगर, पेपर बॉक्स, मालपा डोंगरी क्रमांक ३, शेर ए पंजाब, बिंद्रा संकूल, हंजर नगर, गणेश नगर, शोभना परिसर, सुंदर नगर, गौतम नगर, मॉडर्न बेकरी, प्रजापूरपाडा, त्रिपाठी नगर, मुन्शी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, अचानक कॉलनी, कलेक्टर कंपाऊंड, सारीपूत नगर, दुर्गानगर, मातोश्री क्लब आदी परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.