मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवरील जलवाहतूक प्रकल्पाच्या पर्यावरण सुनावणीनंतर आता पूर्व किनारपट्टीवरील भाऊचा धक्का ते नेरुळ आणि मांडवा दरम्यान जलवाहतूक प्रकल्प राबवण्याबाबत जनसुनावणी होत आहे. या प्रकल्पासाठी मुंबई, ठाणे आणि अलिबाग येथे पर्यावरण सुनावणी होणार आहे. पर्यावरण परवानगीसाठी ही सुनावणी अत्यावश्यक असल्याने प्रकल्प मार्गी लागण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
पूर्व किनारपट्टीवरील जलवाहतूक प्रकल्पासाठी भाऊचा धक्का, नवी मुंबईतील नेरूळ आणि मांडवा येथे बांधकाम होणार असल्याने मुंबई, ठाणे आणि रायगड या तीन ठिकाणी ही जनसुनावणी होईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) हा जलवाहतूक प्रकल्प राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे ३० जानेवारी रोजी मुंबईत, १६ फेब्रुवारी रोजी ठाण्यात तर २१ फेब्रुवारी रोजी रायगडमध्ये ही सुनावणी होणार आहे.
‘एमएसआरडीसी’तर्फे ‘बांधा-वापरा हस्तांतरित करा’ या तत्त्वावर हा प्रकल्प राबवण्यात येणार असून प्रवासी आणि वाहनासहित प्रवास करण्याची सोय असलेली जलवाहतूक सुविधा त्यात असणार आहे. भाऊचा धक्का आणि नेरूळ येथे प्रवासी टर्मिनलचे बांधकाम, भाऊचा धक्का ते पी. डिमेलो रोड दरम्यान पूर्व मुक्त मार्गाला जोडणारा उन्नत मार्ग बांधणे आणि मांडवा येथे प्रवासी टर्मिनलचे बांधकाम या प्रकल्पासाठी करण्यात येणार आहे. या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवून ‘एमएसआरडीसी’ने यापूर्वीच यशस्वी कंत्राटदारांची नावे निश्चित केली आहेत. तो प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा विषयक उपसमितीकडे पाठवण्यात आला आहे. पश्चिम किनारपट्टीवरील जलवाहतूक प्रकल्पाच्या सुनावणीत मच्छिमारी नौकांचा मार्ग रोखला जाण्याची भीती आणि जलवाहतूक प्रकल्पाच्या बोटींमुळे मच्छिमारीवर परिणाम होण्याची भीती मच्छिमारांनी व्यक्त केली होती. याच कारणास्तव त्यांचा प्रकल्पास विरोध आहे. त्यामुळे पूर्व किनारपट्टीवरील जलवाहतूक प्रकल्पावेळीही हेच मुद्दे समोर येण्याची चिन्हे आहेत. पर्यावरण विषयक मुद्दय़ांबाबत समाधानकारक उत्तरे, उपाययोजनांची माहिती सादर झाल्याशिवाय केंद्रीय वन व पर्यावरण खात्याची परवानगी मिळत नाही. परवानगी मिळाल्याशिवाय प्रकल्पाची अमलबजावणी करता येत नाही. त्यामुळे मुंबईतील हा पूर्व किनारपट्टीवरील जलवाहतूक प्रकल्प मार्गी लागण्यासाठी पर्यावरण सुनावणीची प्रक्रिया व्यवस्थित पार पडणे खूपच महत्त्वाचे आहे.

Story img Loader