राज्यातील अध्र्याहून अधिक भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना व जनता पाण्यासाठी चारही दिशा वणवण करीत असल्याच्या पाश्र्वभूमीवर शासनाने राज्यातील जनतेला पाण्याची उधळपट्टी करू नये, असे आवाहन केले. मात्र डोंबिवलीतील तरुणांनी भागशाळा मैदानात बुधवारी धुळवडीनिमित्त शॉवरबाथ करून शेकडो लिटर पाण्याची उधळपट्टी केली.
या तरुणांना पाण्याचा पुरवठा कोणी केला, स्थानिक नगरसेवकाने ही पाण्याची उधळपट्टी रोखण्यासाठी काय प्रयत्न केले? पालिका, पोलीस अधिकाऱ्यांनी या वेळी बघ्याची भूमिका घेतल्याने शहरातील सुजाण नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. भागशाळा मैदानाची निगा राखण्यासाठी देण्यात आलेल्या जलवाहिनीतून या तरुणांनी पाणी घेऊन पाण्याची उधळपट्टी केली असल्याचे या भागातील रहिवाशांकडून सांगण्यात येते. आता पालिकेच्या ह प्रभागाचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता, प्रभाग अधिकारी याप्रकरणी काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader