मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला असून महापालिकेने राज्य शासनाकडे राखीव पाणीसाठा वापरण्याची मागणी केली आहे. मात्र, शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांदरम्यान जलवाहिन्यांना गळती लागून शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. अशातच अनेक झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची उधळपट्टी सुरू असून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे.

झोपडपट्टी भागातील अनेक गल्ली – बोळांमधील जलवाहिन्यांना बूच लावण्यात येत नसल्यानेही मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. अनेकदा चिंचोळ्या गल्ल्या आणि प्रत्येक बोळांमध्ये लक्ष ठेवणे महापालिकेला शक्य होत नाही. अशी प्रकरणे निदर्शनास येत नसल्याने संबंधितांवर कारवाई होत नाही.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांमध्ये पाणीसाठा ३५ टक्क्यांखाली गेला आहे. वातावरणातील उष्म्यामुळे मुंबईकरांची पाण्याची गरजही वाढली आहे. मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागू नये, यासाठी पालिकेने राज्य शासनाकडे राखीव पाणीसाठा वापरण्यासाठी विनंती केली आहे.

Marathi Language Controversy : “मराठी गया तेल लगाने, तुम…”; मुंबईत एल अँड टीच्या सुरक्षा रक्षकाची मुजोरी, मनसेने ‘असा’ शिकवला धडा

दरम्यान, मुंबईत सुरू असलेल्या रस्ते काँक्रिटीकरणादरम्यान दररोज जलवाहिन्या फुटण्याच्या छोट्या- मोठ्या घटना घडत असून त्यातूनही पाण्याची नासाडी होत आहे. कमी दाबाने पाणी येणे, अपुरा पाणीपुरवठा आदी समस्येमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र, अनेक ठिकाणी विशेषत: झोपडपट्टी परिसरात पाण्याचा अपव्यय होत आहे.

गैरसोय होण्याची शक्यता

विकासकामे, मेट्रो प्रकल्प, जलवाहिन्या बदलण्याची कामे आदी विविध कामांमुळे दररोज जलवाहिन्यांना गळती लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पाण्याची नासाडी होते. तसेच महापालिकेच्या कामगारांनाही जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणी साठा कमी होऊ लागला आहे. त्यातच दररोज फुटणाऱ्या जलवाहिन्यांतून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते. झोपडपट्टी आणि अन्य परिसरात विनाकारण होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी व त्यावर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. विविध कारणांमुळे दररोज होणारा पाण्याचा अपव्यय सुरूच राहिल्यास मुंबईकरांची पुरेशा पाण्याअभावी गैरसोय होण्याची दाट शक्यता आहे.

वाहत्या पाण्यातच कामे…

झोपडपट्टी भागातील अनेक घरांमध्ये वाहत्या पाण्यात कपडे धुणे, भांडी घासणे, फरशी पुसणे आदी दैनंदिन कामे केली जातात. त्यामुळे गरजेपेक्षा अधिक पाण्याचा वापर होतो. तसेच, अनेक गल्ली-बोळांत पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या बंद केल्या जात नाहीत. विनाकारण हजारो लिटर पाण्याची नासाडी होते. महापालिकेतर्फे झोपडपट्टीतील प्रत्येक घरात २२५ लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, नागरिकांच्या चुकीच्या सवयींमुळे प्रमाणापेक्षा अधिक पाणी वाया जाते. जलवाहिन्यांना बूच, व्हॉल्व्ह न बसवण्याच्या घटनांमध्ये वापरकर्त्यांवर पाण्याची नासाडी केल्याप्रकरणी कारवाई केली जाते. मात्र, झोपडपट्टी भागातील चिंचोळ्या गल्ल्या आणि बोळांमध्ये लक्ष ठेवणे पालिकेला शक्य नसल्याने संबंधितांवर कारवाई होत नाही.