निम्मा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असून पाण्यासाठी जनतेला वणवण करावी लागत आहे. या जनतेला मुंबईतून पाणी पोहोचविण्याचा महापालिकेचा मानस आहे. पण त्यासाठी वाघिणींची व्यवस्था राज्य सरकारने करून द्यावी, अशी मागणी महापौर सुनील प्रभू यांनी केली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सध्या पुरेसा जलसाठा आहे. या साठय़ातील काही पाणी ग्रामीण भागातील दुष्काळग्रस्तांपर्यंत पोहोचविण्याचा पालिकेचा विचार आहे. हे पाणी रेल्वेच्या वाघिणींमधून ग्रामीण भागात पोहोचविता येईल. परंतु तशी व्यवस्था उपलब्ध केल्यास ग्रामीण भागात पाणीपुरवठा करून दुष्काळग्रस्तांची तहान भागविता येईल, असे सुनील प्रभू यांनी सांगितले. या संदर्भात सुनील प्रभू यांनी मख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठविले आहे. दुष्काळग्रस्तांपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.