माळशेज घाट म्हणजे निसर्गसौंदर्याचा बडा नजराणा! वर्षां ऋतूत तर हा कातळघाट हिरवा शालू नेसलेल्या नववधूसारखा खुलून दिसतो. नागमोडी वळणाचा रस्ता, डोंगराच्या कुशीतून खळाळत वाहणारे दुधाळ धबधबे, हिरवाईने नटलेला नजारा.. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी सज्ज असलेल्या पर्यटकांना जणू काही तो खुणावत असतो. माळशेज घाटातून कल्याणहून ओतूरकडे जाताना डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा दिसतो. तीन धारांमध्ये कोसळणारा हा धबधबा अतिशय मनमोहक पण तितकाच अजस्र्र वाटतो..हाच थितबीचा धबधबा.

थितबी हे माळशेज घाटाच्या पायथ्याशी वसलेले मुरबाड तालुक्यातील गाव. आदिवासी समाजाची अधिक वस्ती असेलेले हे गाव निसर्गसौंदर्याने नटलेले. डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गावात ज्याचे शब्दात वर्णन करता येणार नाही असा उत्तुंग धबधबा आहे. या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी मात्र पायपीट करावी लागते.

कल्याण-अहमदनगर महामार्गावर घाट सुरू व्हायला सुरुवात होते, तिथे एमटीडीसीचे रिसॉर्ट आहे, त्यापूर्वी सावर्णे नावाचे गाव लागते. या गावातून थितबीला गाडीने जाता येत नाही. गावातच गाडी पार्क करून तीन किलोमीटर असलेल्या डोंगरदऱ्यातील थितबी गावात पायी जावे लागते. खरे म्हणजे या पायपीटमध्येच मजा आहे. स्थानिक लोकही रस्ता दाखवण्याचे काम करतात.

धुंद करणाऱ्या वातावरणा दाट धुक्याच्या दुलईतून मार्ग काढत जाण्यात एक वेगळीच मजा असते. हिरवळीतून जाणारी कच्ची पायवाट, आजूबाजूला दाट झाडी, मध्येच उंच-सखल रस्ता, पाण्याचे वाहणारे छोट डोह यांना मागे टाकत आपण धबधब्याच्या दिशेने चालू लागतो. तीन किलोमीटरचे अंतर पायी तुडवत व निसर्गसौंदर्याचा आनंद घेत आपण थितबी गावात पोहोचतो. डोंगराच्या कुशीतले हे टुमदार गाव. सुमारे पंचवीस घरे असणारे हे गाव डोंगरातील शेती आणि जंगलातील साधनसंपत्तीवर उदरनिर्वाह करते.

गावाच्या एका बाजूला थितबीचा धबधबा आहे. उंच डोंगरावरून कोसळणारा हा धबधबा तीन भागांत दिसतो. धबधब्याला मध्येच डोंगराचा अडसर येत असल्याने हा अद्भुत नजारा दिसतो. खाली कोसळणाऱ्या धबधब्याचे पाणी एका डोहात जमा होऊन खाली वाहत जाते. याच डोहात पर्यटक वर्षांसहलीचा आंनद लुटतात. तीन किलोमीटर चालल्यानंतर आलेला थकवा या धबधब्याकडे पाहिल्यानंतर आणि या डोहात डुंबल्यानंतर कुठच्या कुठे पळून जातो. डोहाच्या बाजूला भलेमोठे खडक असून पर्यटक या खडकाभोवतील उभे राहून छायाचित्रणाचा आनंद घेतात. हा डोह एखाद्या नदीसारखा भासतो. अतिशय नितळ जल असलेल्या या डोहात डुंबण्याची आणि येथील निसर्गाचा आंनद घेण्यात एक वेगळीच मजा आहे. अनेक पक्षीही येथे विहार करताना आढळतात. या पक्ष्यांना कॅमेऱ्यात टिपण्यात अनेक पर्यटक आसुसलेले असतात. मात्र या डोहात अनेक दगड-गोटे असल्याने पर्यटकांनी जरा जपूनच जलविहार करावा.

या धबधब्याच्या वर्षांविहार करून परतीच्या वाटेवर लागताना नजर पुन्हा पुन्हा मागे फिरते. या अद्भुत आणि निसर्गसौंदर्याचा अनोखा नजराणा असलेल्या दुधाळ धबधब्याकडे पाहण्याचा मोह काही आवरता येत नाही. हा निसर्गनजारा डोळय़ांत साठवून आपण परतीच्या मार्गाला लागतो.

थितबीचा धबधबा कसे जाल?

  • कल्याण-अहमदनगर महामार्गावर माळशेज घाटाच्या पायथ्याशी सावर्णे नावाचे गाव आहे.  तेथून थितबी गावात जाता येते. सावर्णे गावात गाडी पार्क करून पायी चालत थितबी गावात जावे लागते.