वडाळा परिसरातून पूर्व मुक्त मार्गाकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी भक्ती पार्क येथील रस्त्या वापरण्यात येत होता़  मात्र या वाहतुकीस अजमेरा समूहाने आडकाठी केल्यानंतर वादंग निर्माण झाले होते. अखेर, माहुल खाडीवरील पुलावरून सार्वजनिक रस्ता बांधण्याचे काम पूर्ण होईपर्यंत हा खासगी रस्ता खुला ठेवण्याची विनंती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शुक्रवारी पत्रद्वारे विकासकाला केली. त्यानंतर काही कालावधीसाठी पुन्हा भक्ती पार्क येथील रस्ता खुला झाला आहे.
भक्ती पार्क येथील सध्याचा रस्ता हा पूर्व मुक्त मार्गाला वडाळा परिसराशी जोडण्यासाठी अधिकृत मार्ग नाही. ती तात्पुरती सोय आहे. पूर्व मुक्त मार्गावरून वडाळा ट्रक टर्मिनस परिसराला जोडणारा अधिकृत रस्ता बांधण्याचे काम सुरू आहे. डिसेंबर २०१३ वा त्याआधीच हा रस्ता बांधून तयार होईल. त्यानंतर सध्याचा भक्ती पार्क येथील हा जोडरस्ता बंद करण्यात येणार आहे. अजमेरा समूहाला ही माहिती देऊन अधिकृत रस्ता तयार होईपर्यंत ही वाट मोकळी ठेवावी, असे पत्र देण्यात आल्याचे ‘एमएमआरडीए’ च्या अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.    
मुक्त मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना गेल्या दोन दिवसांपासून आणिक डेव्हलपर्सच्या सुरक्षा रक्षकांनी वडाळा येथील भक्ती मार्गामध्ये आडकाठी केली आहे. हा खाजगी मार्ग आहे, येथून जाता येणार नाही, असे सांगून ते वाहनांना परत पाठवत आहेत. गुरुवारी भक्तीपार्कच्या प्रवेशद्वारावरच बॅरिकेडस लावून काळ्या कपडय़ातले सुरक्षा रक्षक वाहनांना अडवत
होते.
कुचकामी बंदी!
अजमेरा विकासकाने विकसित केलेल्या भक्ती पार्कमध्ये शेकडो निवासी इमारती आहेत. पालिकेचे प्रशस्त उद्यान आहे. तसेच बँकांचे एटीएम सेंटर्स, क्लब हाऊस आणि आयमॅक्स चित्रपटगृह आहे. तेथे जाणाऱ्या लोकांना अडवून कुठे जायचे आहे, असे विचारले जात होते. मात्र मुक्त मार्गावर जाणारी मंडळीसुद्धा भक्तीपार्क वा चित्रपटगृहात जायचे आहे, अशा थापा मारून आपला मार्ग ‘मुक्ती’ करून घेतच होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा