लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: राजकारणात कार्यरत असताना आपण केवळ एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहोत, शत्रू नव्हे हे प्रत्येकाने कायम लक्षात ठेवायला हवे. आपण एकमेकांचा आदर करायला हवा. चुकीच्या गोष्टींविरोधात प्रभावीपणे प्रतिकार जरूर करावा, पण त्याचबरोबर आपल्या प्रतिस्पर्ध्याशी सन्मानाने वागावे. लोकप्रतिनिधी या नात्याने आपले विधानसभेतील आचरण अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण भावी पिढी समोरील आदर्श आहोत, असे प्रतिपादन भारताचे माजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी शनिवारी केले.
राष्ट्रीय आमदार परिषदेच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, संविधान तयार करताना तत्कालिन नेत्यांना भविष्याप्रती असलेल्या जबाबदारीची तीव्र जाणीव होती. म्हणूनच, आपण त्यांच्या आदर्शांचे पालन करायला हवे. आज जगभरात भारताला नवी ओळख आणि सन्मान मिळाला आहे. मात्र, आपल्या समोर विविध आव्हाने आहेत. बेरोजगारी, दारिद्रय, निरक्षरता आदी विविध समस्यांशी देश झगडत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपण व्यवस्थेतील दोष दूर करण्यासाठी सकारात्मक योगदान दिले पाहिजे, असे आवाहन नायडू यांनी उपस्थित आमदारांना केले.
आणखी वाचा-मुंबई: गोखले पुलावरून वाहतूक सुरू करण्यासाठी आता डिसेंबरचा मुहूर्त
अमृतकाळच्या दिशेने प्रवास करताना स्थिर, प्रगतीशीर, बलशाली भारताची निर्मिती करणे हे आपल्या सर्वांचे अंतिम ध्येय असायला हवे. आपले ध्येय इतरांवर वर्चस्व गाजविणे नसून, आत्मनिर्भर भारताची मुहूर्तमेढ रोवणे आहे. शांतता हा प्रगतीचा मुख्य आधार असून त्याशिवाय आपण देशाच्या विकासावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यामुळे देशात शांतता राखायला हवी, असे वैंकय्या नायडू यांनी सांगितले.
भारतातील विविध राजकीय पक्षांच्या आमदारांनी परिषदेत निरनिराळ्या विषयांवर संवाद साधला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून परिषदेत सहभागी झाले होते. देशाच्या उदारमतवादी आणि प्रजासत्ताक लोकशाहीचे जतन करणे आपल्या सर्वांसमोर मोठे आव्हान आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी, तसेच प्रजासत्ताक देशाची मूळ संकल्पना अबाधित राखण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय आमदार परिषदेच्या समारोप सोहळ्याला माजी लोकसभा अध्यक्ष डॉ. मीरा कुमार, सुमित्रा महाजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, कम्युनिस्ट पक्षाच्या जेष्ठ नेत्या वृंदा करात आदी मान्यवर उपस्थित होते.