शरद पवार यांनी माढा लोकसभा लढवावी अशी मागणी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
जागा वाटपाबाबत अजून चर्चा सुरू आहे. मित्रपक्ष एकत्र यावेत असे आम्हाला वाटत आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा लढवावी, याबाबत चर्चा सुरु असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
लोकसभेची वेगवेगळ्या मतदारसंघात आखणी करत आहोत. गुरूवारी शरद पवार हे मुंबईमध्ये ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठक घेत आहेत. आघाडीच्या एकत्रितच जागा जाहीर केल्या जातील. वेगवेगळया जाहीर होणार नाहीत, असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी सांगितले.
आज देशात वातावरण बदललेले आहे. त्यामुळे शरद पवार यांनी लोकसभेत जावे असे सर्वांना वाटत आहे. शरद पवार हे सर्व पक्षांना एकत्र करून जातीनिशी लक्ष घालत आहेत. भाजप- शिवसेनेचा पराभव करण्याची ज्या पक्षांची इच्छा आहे त्या सर्व पक्षांना बरोबर घेतले जाईल. इतर पक्षाच्या नेत्यांशी चर्चा आता होणार नाही. भेटीगाठीचे पर्व संपले आहे. आता जागा वाटप यावरच चर्चा सुरु आहे असेही पाटील म्हणाले.
लोकसभा संपत आहे. त्यामुळे या बैठकीत लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल. शिवाय लोकसभेचा प्रचार कसा करायचा यावर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.