शिवसेना, भाजप व रिपब्लिकन पक्षाची महायुती भक्कम असून चौथ्या भिडूची आम्हाला गरज नाही, असे सांगत महायुतीमध्ये मनसेच्या समावेशाची शक्यता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेटाळून लावली.  मनसेला युतीत सहभागी करून घेण्यासंदर्भात भाजप नेते गोपिनाथ मुंडे, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनी केलेली विधाने, रिपाइंचे नेते रामदास आठवले यांचे मनसेला आवताण आणि यावरून सुरू झालेल्या चर्चेवरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी केलेली टीका या पाश्र्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी हे वक्तव्य केले. येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांना युतीतील मनसेच्या समावेशाबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. ‘तेव्हा मी आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. ‘त्यानेही’ आपली भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे आता हा विषय संपलेला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांचीही नुकतीच भेट झाली. युतीमध्ये नव्या पक्षाच्या समावेशाचा प्रस्ताव नसल्याचे त्यांनी सांगितले. युती भक्कम असून आणखी कोणाचीही गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते,’ असे उद्धव म्हणाले.
मोदींबाबत घूमजाव!
मोदी यांनी मोठय़ा प्रमाणावर गुजराती बांधवांची उत्तराखंडमधून सुटका केल्याची बातमी आल्यावर ‘सामना’च्या अग्रलेखातून त्यांच्यावर मंगळवारी टीकास्त्र सोडण्यात आले. त्यामुळे भाजप नेत्यांमध्ये नाराजी पसरल्यानंतर उद्धव यांनी घाईघाईने दुपारी पत्रकार परिषद घेत मोदींचे गुणगान केले. आम्ही मोदींवर टीका केली नसून अग्रलेखातील मुद्दे राजकीय भूमिकेतून घेऊ नयेत. मोदी हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्याकडून आमच्या काही अपेक्षा आहेत. मोदींनी उत्तराखंडमध्ये ज्याप्रकारे काम केले, त्याचे अनुकरण अन्य मुख्यमंत्र्यांनीही करावे असे ठाकरे यांनी सांगितले.
..तरीही भाजप नाराज
‘सामना’तून झालेल्या टीकेचे भाजपमध्ये पडसाद उमटले आहेत. उत्तराखंड ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचे मोदींनी म्हटल्याचे कार्यकारी संपादकांनी नजरेआड का केले, असा सवाल विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केला. मोदींचे काम न पाहता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कामाचे कौतुक करण्याची आवश्यकता नव्हती, असे तावडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पुन्हा एकदा मनसेला सोबत घेण्याबाबत वक्तव्य केले. ‘सर्व विरोधकांना एकत्र घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे’, असे ते म्हणाले.

Story img Loader