संदीप आचार्य
मुंबई : पावसाळ्याच्या तोंडावर आता मुंबई करोनापासून वाचवायची असेल तर टाळेबंदी अत्यंत कठोर करण्याची गरज असून करोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला शोधून किमान १४ दिवस त्यांचे विलगीकरण कले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका वैद्यक क्षेत्रातील ज्येष्ठ डॉक्टरांनी मांडली आहे. तसंच हे होऊ शकलं  नाही तर मुंबईवरील करोनाचं संकट जास्त भयावह होईल अशीही भीती व्यक्त करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“गेल्या काही दिवसांपासून देशपातळीवर सरासरी पाच हजार रुग्ण सापडत आहेत तर एकट्या मुंबईत रोजचे दोन हजाराहून जास्त रुग्ण सापडत असून वाढत्या रुग्णांचा विचार करता रुग्णालयीन व्यवस्था उभी करणे महापालिकेपुढे आव्हान बनले आहे. मुंबईत आज तीस हजाराहून जास्त रुग्ण असून मृत्यूची संख्या आता एक हजाराहून अधिक झाली आहे. रुग्णोपचाराच्या व्यवस्थेचे शिवधनुष्य एकवेळ पेलता येईल पण करोनाची साखळी तोडणे हे खरे आव्हान आहे” असे लीलावतीमधील ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

“करोनाची साखळी तोडण्यासाठी करोना रुग्णांबरोबरच त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला शोधून किमान १४ दिवस विलगीकरणाखाली म्हणजे क्वारंटाइन केले पाहिजे. तसेच लक्षणे नसलेल्या करोना बाधितांनाही घरी अथवा संस्थात्मक चौदा दिवस क्वारंटाइन करणे अत्यावश्यक आहे” असेही डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. “केरळसारख्या राज्याने तिहेरी टाळेबंदी केली. करोना रुग्णापासून ते संपर्कातील व्यक्तीना चौदा दिवसांपासून २८ दिवसांपर्यंत क्वारंटाईनखाली सक्तीने ठेवले गेले. यातूनच केरळमधील करोनाची साखळी तोडण्यात यश आले” असेही डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

“केरळ व मुंबईत खूप मोठा फरक आहे. साठ लाखाहून अधिक लोक झोपडपट्टीत राहातात. धारावीपासून ते बोरीवलीच्या गणपत पाटीलनगरपर्यंत अनेक ठिकाणी पसरलेल्या झोपडपट्ट्या तसेच टाळेबंदीबाबत लोकांची असलेली उदासीनता यातून करोनाबाधित वाढत आहेत. अशावेळी करोनाबाधितांच्या संपर्कात आलेली एक एक व्यक्ती शोधणं आवश्यक आहे अन्यथा ही साखळी तुटणार नाही. या संपर्कातील लोकांना शोधून विलगीकरणाखाली ठेवणे गरजेचे आहे” असंही डॉ. जोशी म्हणाले. अलीकडे संपर्कातील तसेच लक्षणे नसलेल्यांना आठव्या वा दहाव्या दिवशी घरी सोडले जाते ते अत्यंत चुकीचे असल्याचे डॉ. शशांक जोशी म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हीही सातत्याने करोनाची साखळी तोडण्यास सांगत असून यासाठी लोकांना टाळेबंदीचे काटेकोर पालन करण्याचे सातत्याने आवाहन करत आहेत. तथापि मुंबई व ठाण्यात टाळेबंदीचे पालन जवळपास होत नसल्याचे अनेक भागात दिसून येत आहे. पोलिसांमध्येही मोठ्या प्रमाणात करोनाची लागण दिसून आल्यामुळे पोलिसही आता कंटाळलेले दिसत आहेत. यातून जागोजागी पोलीस दिसत असले तरी त्यांची कारवाई मात्र थंडावली आहे. नेमक्या याच वेळी महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहेल यांनी “एका करोना रुग्णामागे दहा संपर्कातील लोकांना शोधून काढण्याचे आदेश जारी केले आहेत. ही मोहीम किती जोरात राबवली जाईल यावर करोनाची साखळी तुटण्याचे भवितव्य अवलंबून आहे” असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.

“आमचे सारे डॉक्टर जीवाची बाजी लावून रुग्णांवर उपचार करत आहेत तथापि जोपर्यंत करोनाची साखळी तुटणार नाही, तोपर्यंत मुंबईतील करोना खऱ्या अर्थाने आटोक्यात येणार नाही”, असे डॉ. मोहन जोशी म्हणाले. राज्याची आर्थिक परिस्थिती हा संपूर्णपणे वेगळा विषय आहे. तथापि टाळेबंदीबाबत जराही दयामाया दाखवता कामा नये असेही डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले तर टाळेबंदी कडक करण्याची नितांत गरज असल्याचे मुंबईसाठी नेमलेल्या कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी सांगितले. मला मान्य आहे की लोक आता टाळेबंदीला कंटाळले आहेत पण करोनाची साखळी तोडण्यासाठी परिणामकारक टाळेबंदी लागू केली पाहिजे तसेच करोना रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे काटेकोर विलगीकरण हाच पर्याय असल्याचे डॉ. संजय ओक म्हणाले. रुग्ण वाढत असल्याने त्यांचे योग्य वर्गीकरण करून त्यानुसार उपचाराची व्यवस्था करणे तसेच करोना रुग्णांच्या संपर्कातील लोकांना शोधून साखळी तोडणे तसेच रुग्णांसाठी पुरेशा रुग्णवाहिकांची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे केईएमचे माजी अधिष्ठाता व मुंबइतील मृत्यू रोखण्यासाठी उपाय सुचविण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We have to break the chain of corona virus says senior doctors in mumbai scj