सुहास जोशी
टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात शहर सोडून सायकलने निघालेल्या अनेकांना विविध वाहनांची साथ मिळाल्याने लवकरच आपले गाव गाठणे शक्य झाले. यात एसटीचा वाटा मोठा होता. महाराष्ट्रातून झालेल्या प्रवासात ठिकठिकाणी अन्न-पाण्याचीही मदत झाल्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार आणि ओदिशाच्या या कामगारांना काहीसा दिलासा मिळाला.
गेल्या दहा दिवसांत मुंबई आणि महानगर परिसरातून हजारो परप्रांतीयांनी आपल्या मूळ गावी मिळेल त्या वाहनाने स्थलांतर सुरू केले. त्याचबरोबर अनेकांनी नवीन अथवा जुन्या सायकली खरेदी करून गावचा रस्ता धरला. दिवसाला सुमारे शंभर किमी सायकल दामटवत गावी पोहचण्याचे त्यांचे नियोजन होते. मात्र वाटेत त्यांना एसटी, ट्रकची जोड मिळाल्याने पाच-सहा दिवसांतच त्यांनी आपले गाव गाठले.
मधुबनी जिल्ह्य़ातील बालाबखार गाव गाठण्यासाठी गेल्या शनिवारी अनिल आणि त्यांच्या १५ सहकाऱ्यांनी भिवंडी येथून सायकलने प्रवास सुरू केला. कसारा घाट चढल्यानंतर त्यांना एसटीने राज्याच्या सीमेपर्यंत सहज जाता आले. मात्र त्यानंतर वाहन मिळत नसल्याने इंदूरच्या दिशेने त्यांनी सायकली दामटवल्या. दरम्यान एका ट्रकमधून त्यांनी बरेच अंतर कापले. झाशीनंतरच्या टप्प्यात ७० किमीचा सायकल प्रवास करून उत्तर प्रदेश-बिहारची सीमा गाठल्याचे अनिल यांनी सांगितले. अखेरीस शुक्रवारी दुपारी ते आपल्या गावी पोहचले. या प्रवासासाठी त्यांना सोळाशे रुपये खर्च करावे लागले.
अलाहाबादपासून ७० किमीवरच्या साजी या गावचे रघुवीर प्रजापती गेल्या रविवारी एकटेच सायकलने निघाले ते पाच दिवसांत अर्धा प्रवास सायकलने, तर अर्धा प्रवास ट्रकने करून शुक्रवारी सकाळी गावी पोहचले. अलाहाबाद येथे त्यांची वैद्यकीय तपासणी करून कोणतेही लक्षण न आढळल्याने घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला. या प्रवासात त्यांना सुमारे एक हजार रुपये खर्च करावे लागले. मुंबईहून ओदिशाला निघालेले फुलमणी यांना वाटेत वाहने मिळाल्याने ते आणि त्यांचे सहकारी दोन दिवसांपूर्वीच गावात पोहचले.
महाराष्ट्रात चांगले सहकार्य
सायकल, ट्रक असा प्रवास करून गावाला पोहचलेल्या सर्वानीच महाराष्ट्रातील नागरिकांनी प्रवासात केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तुलनेने पुढील प्रवासातील मदतीचे स्वरूप खूपच मर्यादित असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील काही टप्प्यांत अडचणी होत्या, तर काही एक दोन ठिकाणी खूपच चांगल्या प्रकारे मदत मिळत गेल्याचे मधुबनीचे अनिल यांनी सांगितले. झाशीच्या पुढील टप्प्यात मदतीची वानवा असल्याचे रघुवीर प्रजापती यांनी सांगितले.
१५ दिवसांचा खडतर प्रवास
टाळेबंदीचा तिसरा टप्पा जाहीर होण्यापूर्वीच काहीजणांनी सायकलींवरून गावी जाण्यास सुरुवात केली. बिहारमधील आख्तवाडा येथे जाण्यासाठी त्रिदेव साहनी यांनी १५ जणांबरोबर एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ातच मुंबई सोडली. त्यावेळी ट्रकने प्रवास करण्याची सुविधा मर्यादित होती आणि पोलिसांची नाकाबंदीदेखील कडक. त्यामुळे सोबतच्या पाच जणांनी परतीची वाट पकडली. बाकीच्यांनी बहुतांश प्रवास सायकलनेच सुरू ठेवला. सोबत शिधा आणि स्टोव्ह असल्याने स्वत:च शिजवण्यावर भर होता. या सर्वाना वाहनांची सुविधा बहुतांश टप्प्यात मिळालीच नाही. त्यातच एक सायकल नादुरुस्त झाल्याने त्यांना वाटेतच ती विकून, त्या व्यक्तीस डबलसीट न्यावे लागले. पहाटे लवकर निघून १२ तास सायकलिंग करून हा चमू ७ मे रोजी बिहारमध्ये पोहचला. त्यानंतर पंचायतीने त्यांना अलगीकरणात ठेवल्याचे त्रिदेव साहनी यांनी सांगितले.