“ सर्व भारतीयांच्या एकतेचा आधार आपली मातृभूमी व देशाच्या गौरवशाली परंपरा आहेत. भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुसलमानांचे पूर्वज एकच आहेत. आपल्या दृष्टीने हिंदू हा शब्द आपली मातृभूमी, पूर्वज आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रतिशब्द आहे. म्हणूनच आम्ही प्रत्येक भारतीय नागरिक हिंदूच आहेत असे मानतो. कोणाच्याही मताचा येथे अनादर होणार नाही. परंतु आपणास मुस्लिम वर्चस्वाचा नव्हे तर भारतीय वर्चस्वाचा विचार करावा लागेल. राष्ट्रहितास प्राधान्य देऊन त्यादिशेने अग्रेसर होण्याकरिता सर्वांना सोबत पुढे जावे लागेल.”, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
ग्लोबल स्ट्रेटेजिक पॉलिसी फाउंडेशनद्वारे मुंबईत आयोजित “राष्ट्र प्रथम – राष्ट्र सर्वोतोपरी” या विषयावर आयोजित संगोष्ठीमध्ये डॉ मोहन भागवत यांच्यासोबतच केरळचे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान व काश्मीर केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू ले. जन. (नि.) सय्यद अता हसनेन यांनी आपले विचार मांडले.
आपल्या उद्बोधनात सरसंघचालक म्हणाले की, “ विदेशी आक्रमकांसोबत इस्लाम भारतात आला, हाच इतिहास आहे आणि तो तसाच सांगितला गेला पाहिजे. मुस्लिम समाजातील विवेकी नेतृत्वाने आततायी गोष्टींचा विरोध करायला हवा. कट्टरपंथीयांसमोर त्यांना आपली भूमिका ठामपणे मांडावी लागेल. हे कार्य निरंतर करावे लागेल. आपल्या सर्वांसाठी हा खडतर परीक्षेचा काळ आहे. जेवढ्या लवकर आपण हे कार्य आरंभ करू, तितकेच आपल्या समाजाचे नुकसान आपण टाळू शकू. भारत भविष्यात महाशक्ती होईल, ते इतरांना घाबरविण्यासाठी नाही. तर तो विश्वगुरूंच्या स्वरूपात विराजमान होईल. युगानुयुगे आपण जड आणि चेतन या दोघांच्या उत्थानासाठी प्रयत्नशील आहोत. हाच आमचा मूलभूत विचार असल्यामुळे आमच्यापासून कोणीही भयभीत होण्याची गरज नाही.”
आरिफ महंमद खान म्हणाले की, “विश्वातील विविधतेला ज्या ज्या ठिकाणी बाधा निर्माण केली गेली, त्या सर्व ठिकाणी भयंकर संकटांना तोंड द्यावे लागल्याचा इतिहास आहे. याउलट ज्या ज्या ठिकाणी ही विविधता जपली गेली, तो समाज संपन्न असल्याचे आपण पाहू शकतो. भारतीय संस्कृतीत कुणालाही परके मानलेले नाही. कारण येथे सर्व समान आहेत.”
ले. जन. (नि.) सय्यद अता हसनेन यांनी आपल्या संबोधनातून भारतीय मुस्लिम बुद्धिजीवी समाजाला धोक्याचा इशारा दिला. पाकिस्तान १९७१ पासून व्यापक रणनीती अंतर्गत भारताला रक्तरंजित करण्याचे प्रयत्न करीत आहे. भारत सरकार, भारतीय लष्कर, पोलीस आणि जम्मू-काश्मिरच्या जनतेने गेल्या ३० वर्षांत हे षडयंत्र पार धूळीस मिळविले. परंतु वर्तमान संदर्भात पाकिस्तानद्वारा भारतीय मुस्लिमांना लक्ष्य केले जाईल. मुस्लिम बुद्धिजीवींनी सावध राहून हे कारस्थान हाणून पाडले पाहिजे, असं ते म्हणाले.