शिवसेनेत मनसेचे विसर्जन केल्यास राज ठाकरे यांचे महायुतीत स्वागत केले जाईल, अशी वेगळीच भूमिका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत मांडली. मनसेचे अस्तित्व कायम ठेवून राज यांना महायुतीत घेण्याचा प्रयत्न झाला तर मात्र आरपीआयला वेगळा विचार करावा लागेल, त्याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सामनातील मुलाखतीनंतर उद्धव-राज एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे रामदास आठवले अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी शुक्रवारी त्याबाबत आपली भूमिका मांडली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात शिवसेना-भाजप-आरपीआय अशी महायुती तयार झाली
आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला महायुतीच पर्याय होऊ शकतो, मनसे नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तरीही मनसे बरखास्त करुन राज ठाकरे यांनी शिवसेनेत पुन्हा यावे, तसे झाले तर त्यांचे महायुतीत स्वागत केले जाईल, असे ते म्हणाले. मात्र मनसे कायम ठेवून महायुतीत त्यांना घेण्यास शिवसेना-भाजप तयार असेल तर आरपीआयला वेगळा विचार करावा लागेल, असे त्यांनी
सांगितले.
मुंबई महापालिका निवडणुकीत आरपीआयला फारसे यश मिळाले नसले तरी मुंबई व ठाण्यात आरपीआयमुळे महायुतीला सत्ता मिळाली. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आमच्यामुळेच भाजपचा विजय झाला, हे कुणी विसरु नये, याची आठवण आठवले यांनी भाजप-सेनेला करुन दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा