मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात आले होते. तेव्हा शिवसेना पक्ष कार्यालयात त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज होतो, मात्र शिवसेना पक्ष कार्यालयात ते आलेच नाहीत. आम्ही शिवसैनिक आहोत असे मुख्यमंत्री वारंवार सांगतात, आम्ही शिवसेनेच्या कार्यलयात त्यांची पुष्पहार घेऊन वाट बघत होतो, मात्र महानगरपालिका मुख्यालयातील भाजपच्या कार्यालयाला भेट देऊन ते निघून गेले, असा टोला माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी लगावला.

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी प्रथमच मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाला भेट दिली. मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर मुख्यालयातील शिवसेना पक्ष कार्यालयात न जाता ते थेट भाजपच्या कार्यालायत गेले. त्यावरून पालिका वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी मुख्यालयातील आपत्कालीन कक्षाला भेट दिली. यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी वरील दावा केला. मुख्यमंत्री दुपारी येणार असे आम्हाला कळले होते. त्यामुळे आम्ही पुष्पहार घेऊन त्यांची वाट बघत होतो. पण त्यांना यायला उशीर झाला. ते आले तेव्हा शिवसेना कार्यालयात कोणी नव्हते म्हणून ते आले नसतील, तर कार्यालयात शिवसेनाप्रमुखांची, छत्रपती शिवरायांची प्रतिमा आहे, तेथे येऊन ते नतमस्तक होऊ शकले असते, असाही टोला पेडणेकर यांनी लगावला.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत पाणी साचते. मात्र यंदा पावसाळ्यात मुंबईतील पाणी साचणारी ठिकाणे कमी झाली आहेत. काही ठिकाणी पाणी साचले, परंतु तेवढ्याच जलदगतीने पाण्याचा निचराही झाला हे शिवसेनेचे यश आहे, असेही त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट दिली तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना मुंबई महानगरपालिकेच्या कामाचे कौतुक केले. महानगरपालिकेने गेल्या काही वर्षात उदंचन केंद्र, भूमिगत पाणी साठवण टाक्या, पाणी उपसा करणारे पंप आदी उपाययोजना केल्याने यंदा मुसळधार पाऊस पडला तरी पाण्याचा निचरा कमी वेळात झाला, असेही ते म्हणाले. पालिकेने गेल्या काही वर्षांत केलेल्या कामांची एकनाथ शिंदे यांनी स्तुती केली. म्हणजे शिवसेनेने चांगले काम केले हे स्पष्ट होते, असेही त्या म्हणाल्या

Story img Loader