नियोजनाप्रमाणे सर्व काही घडले तर आठवड्याभरात भारतीय जनता पक्षाच्या काही उमेदवारांची नावे पक्षाच्या केंद्रीय संसदीय समितीकडे पाठविण्यात येतील आणि त्यांच्या मंजुरीनंतर ती जाहीर केली जातील, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईत दिली. भाजपच्या प्रदेश समितीची समितीची बैठक मुंबईत झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी या बैठकीत कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली, याची माहिती दिली.
या बैठकीला पक्षाचे नवे महाराष्ट्र प्रभारी ओमप्रकाश माथूर, राजीव प्रताप रुडी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, महायुतीत आमच्याकडे असणाऱया जागांवर कोणाला उमेदवारी देता येईल, याची यादी आठवडाभरात केंद्रीय संसदीय समितीकडे पाठविण्यात येईल. केंद्रीय समितीने मंजुरी दिल्यानंतरच या नावांची घोषणा केली जाईल. विधानसभा निवडणुकीत प्रचाराची रणनिती आखण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. प्रचार कसा केला पाहिजे, त्यासाठी कोणकोणती माध्यमे वापरली पाहिजेत, यावर आम्ही चर्चा केली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या आठवड्यात मुंबईत येणार असले, तरी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याबाबत अजून काही ठरलेले नाही. अमित शहा मुंबईतील काही गणेश मंडळांना भेट देतील आणि त्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील, एवढेच आत्ता ठरलेले आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांची भेट घेणार नाहीत, म्हणजे दोन्ही पक्षांमध्ये कोणताही तणाव नसल्याचे त्यांनी सांगितले. योग्यवेळी ते उद्धव ठाकरे यांना नक्की भेटतील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
जागावाटपाबाबत आधी आम्ही आणि शिवसेनेने मित्रपक्षांशी बोलणी करण्याचे ठरविले आहे. ती बोलणी सध्या सुरू आहेत. ते झाल्यानंतर दोन्ही पक्षांचे जागावाटपाचे सूत्र निश्चित केले जाईल, असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा