राज्यात सध्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शिंदे गटातील वाद अधिकच वाढताना दिसत आहे. दोन्ही गटातील नेत्यांकडून जोरदार आरोपप्रत्यारोप केले जात आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेचे दिवंगत नेते रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले जात आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाकडून ऋतुजा लटके यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे आणि ऋतुजा लटके यांना उद्धव ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी उभे राहता येऊ नये म्हणून त्यांचा राजीनामा न स्वीकारण्यासाठी पालिका प्रशासनावर दबाव टाकला जात आहे, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए)चे अध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी देखील या निवडणुकीबाबत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

रामदास आठवले म्हणाले “अंधेरी पोटनिवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा भाजपाच्या उमेदवारास पाठिंबा आहे. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार शंभर टक्के निवडून येणार आहे. उद्धव ठाकरे यांची मशाल जरी पेटलेली असल्याचं दाखवलेलं असलं तरी या निवडणुकीत ही मशाल विझवण्याचं काम आम्ही करणार आहोत. भाजपाचं कमळ आम्हाला फुलवायचं आहे आणि मशाल विझवायची आहे. यासाठी रिपब्लिकन पक्ष नक्कीच भाजपाच्या पाठिशी उभा राहणार आहे. ही निवडणूक आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकणार आहोत. कारण, आमच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, मजबूत अशी महायुती आहे.”

हेही वाचा : अंधेरी जागेप्रकरणी मिंधे गट रडीचा डाव खेळतोय – अंबादास दानवे

शिंदे गटाच्या या कथित प्रयत्नानंतर लटके नेमकं कोणत्या गटाकडून निवडणूक लढवणार असा प्रश्न निर्माण झालेला असतानाच, पालिकेने कमर्चारीपदाचा राजीनामा मंजूर करावा यासाठी ऋतुजा लटके यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे याबाबतचे गूढ आणखी वाढले आहे.

Story img Loader