भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर झाल्यास शिवसेना त्याचे स्वागतच करेल, असे खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. 
मोदी यांनी गुरुवारी रात्री उशीरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी करून त्यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ सकारात्मक चर्चा झाल्याचे राऊत म्हणाले. प्रत्येक पक्षात नेतृत्त्वावरून मतभेद असतात. कॉंग्रेस पक्षातही राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावरून वाद आहेत. तिथेही सर्वसहमती नाहीये, याकडेही राऊत यांनी लक्ष वेधले.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदी यांचे नाव शुक्रवारी संध्याकाळी जाहीर होण्याची शक्यता आहे. पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक नवी दिल्लीमध्ये होणार आहे. त्यामध्येच मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरच मोदी यांची पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून निवड झाल्यास त्यांचे स्वागतच करू, असे राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेना हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष आहे.