मुंबई : मुलुंड परिसरात मंगळवारी सापडलेल्या एका अशक्त सोनेरी कोल्ह्याला जीवदान देण्यात वन विभाग, तसेच ‘रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वेल्फेअर’(रॉ) संस्थेला यश आले. दरम्यान, सध्या कोल्ह्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासणीत कोल्हा निर्जलीकरणामुळे अशक्त झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मुलुंड (पूर्व) येथील नवघरमधील एका गृहसंकुलाच्या परिसरात पहाटे ६ वाजता एका अशक्त सोनेरी कोल्ह्या सापडला. वनविभागाच्या पथकाने ‘रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वेल्फेअर’(रॉ) संस्थेच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. गृहसंकुलातील एका मोटारगाडीखाली सोनेरी कोल्हा असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. माहिती मिळताच वनविभगाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कोल्ह्याला वनविभागाच्या पथकाने गाडीखालून बाहेर काढले. वनविभागाच्या समन्वयाने ‘रॉ’ संस्था त्याच्यावर उपचार करीत आहे. सध्या कोल्ह्याच्या विविध वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत. हा सोनेरी कोल्हा ठाण्याच्या खाडी परिसरातून या गृहसंकुलात आल्याचा संशय आहे.
दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबई महानगर प्रदेशातील वन्यजीवांच्या नष्ट झालेल्या अधिवासाकडे लक्ष वेधले आहे. तसेच यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाची शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे. अधिवास नष्ट होणे, भटके कुत्रे, तसेच रस्त्यावरील अपघात यामुळे या प्रजातीचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मुंबईचा पश्चिम किनारा, मध्य मुंबईत, नवी मुबंईतील काही भाग आणि ठाणे खाडीच्या आसपास असलेल्या कांदळवनात सोनेरी कोल्हा दृष्टीस पडतो. याचबरोबर स्थलांतरित पक्षी, वेगवेगळे वन्यप्राणी, कीटक आणि सूक्ष्मजीवही आढळतात. मात्र, सोनेरी कोल्ह्याचा अधिवास कमी होत असल्याने त्यांच्या संख्येवर परिणाम होत आहे. यापूर्वी अनेक वेळा विक्रोळी, कांजूरमार्ग, कांदिवली, ऐरोली येथील मानवी वस्तीत सोनेरी कोल्हा आढळला आहे.
रेबीजची लागण होऊन सोनेरी कोल्ह्याचा मृत्यू
चेंबूर परिसरात रेबीजची लागण होऊन तीन सोनेरी कोल्ह्यांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबर महिन्यात एका सोनेरी कोल्ह्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. हा पहिला मृत्यू होता. त्यानंतर काही दिवसांतच दोन सोनेरी कोल्ह्यांचा रेबजची लागण होऊन मृत्यू झाला होता.
चेंबूरमध्ये तरुणावर हल्ला
रेबीजची लागण होऊन मृत्यू आणि भटक्या श्वानांमधील संघर्षाच्या घटना घडत असताना काही महिन्यापूर्वी चेंबूरमध्ये एका पिसाळलेल्या कोल्ह्याने तरुणावर हल्ला केला होता. या हल्ल्यात कोल्ह्याने तरूणाच्या उजव्या पायाचा चावा घेतला होता. एका गृहसंकुलाच्या आवारात ही घटना घडली होती.
काही महिन्यांपूर्वी खारघरमध्ये कोल्ह्याचा मृत्यू
नवी मुंबई येथील खारघर येथे काही महिन्यांंपूर्वी सोनेरी कोल्हा मृतावस्थेत आढळला होता. नवी मुंबई परिसर पाणथळ जागा आणि कांदळवन क्षेत्रासाठी ओळखला जातो. आजघडीला गर्दीने गजबजलेल्या नवी मुंबईत एकेकाळी घनदाट जंगल होते. असंख्य पशु-पक्ष्यांच्या प्रजाती येथे आढळत होत्या. कालांतराने येथे मनुष्यवस्ती वाढली, मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आली. असे असले तरी आजही तेथे काही वन्यप्रजाती वाढत असून या वन्यप्रजाती शरहीकरणाला तोंड देत तग धरून आहेत. त्यापैकीच एक दुर्मीळ सोनेरी कोल्हा. कांदळवन हा या कोल्ह्यासाठी सुरक्षित अधिवास आहे. आजही नवी मुंबईतील कांदळवन परिसरात सोनेरी कोल्हा आढळतो. कांदळवन परिसंस्थेतील हा प्रमुख सस्तन प्राणी असून नवी मुंबई परिसरात त्यांचा अधिवास आहे.
संवर्धन, संरक्षणासाठी ठोस उपयायोजनांचा
अभाव कांदळवन परिसंस्थेतील हा प्रमुख सस्तन प्राणी असून नवी मुंबई परिसरात त्यांचा अधिवास आहे. याबाबत अद्याप नियोजनबद्ध सर्वेक्षण झालेले नाही किंवा त्याच्या संवर्धनासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. याबाबत पर्यावरण अभ्यासकांनी वन्यजीव सुरक्षेसाठी विविध सरकारी यंत्रणांकडे तक्रार केली आहे.