मुंबई : उरण येथील एका गावात अशक्त अवस्थेत आढळलेल्या हिमालयीन गिधाडाचा बचाव केल्यानंतर उरणच्या वन विभागाने त्याला वैद्यकीय उपचारांसाठी ‘रेस्क्युइंक असोसिएशन फॉर वेल्फेअर’ (रॉ) या संस्थेकडे सुपूर्द केले आहे. दरम्यान, वैद्यकीय उपचारानंतर गिधाडामध्ये सुधारणा झाली असून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वनविभागाशी चर्चा सुरू आहे. उरणमधील चिरनेर गावात जानेवारी महिन्यात अशक्त गिधाड आढळले होते. वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या या गिधाडाला वैद्यकीय उपचरांसाठी रॉ या संस्थेकडे सुपूर्द केले. प्रथमदर्शनी गिधाड निर्जलीकरणामुळे अशक्त झाल्याचे निदर्शनास आले. तपासणीअंती ते कुपोषित असल्याचेही लक्षात आले. सध्या त्याच्यावर रॉ संस्थेचे पशुवैद्यकीय पथक उपचार करीत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, गिधाड ज्या गावात सापडले तेथे काही दिवसांपूर्वी बर्डफ्लूची साथ असल्याचे घोषित करण्यात आले होते. या परिसरात कुक्कुटपालकाच्या कोंबड्या बाधित हाऊन मृत झाल्या होत्या. तेथील बर्जफ्लू रोखण्यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी कोंबड्या मारण्याचे आदेश देखील दिले होते. हे गिधाड बर्डफ्लू बाधित क्षेत्रातील एक किलोमीटरच्या परिसरात आढळले होते. या पार्श्वभूमीवर हिमालयीन गिधाडाची एव्हीयन इन्फ्लूएंझाची चाचणी करण्यात आली. यामुळे हिमालयीन गिधाड नेमके कशामुळे अशक्त आणि कुपोषित झाले हे कळण्यास मदत झाली. दरम्यान, वैद्यकीय चाचणीच्या अहवालानुसार निर्जलीकरणामुळे गिधाड अशक्त झाल्याचे समोर आले. त्याला बर्डफ्लूची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले.

निसर्गाची अन्न साखळी आणि स्वच्छता राखणारा घटक म्हणून गिधाड अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, हा पक्षी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) गिधाडांच्या संवर्धनासाठी पावले उचलली आहेत. हरियाणा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि आसाम या चार राज्यांमध्ये बीएनएचएसची गिधाड प्रजनन केंद्रे आहेत. सोसायटीने २००४ पासून गिधाडांच्या कृत्रिम प्रजननाचे काम सुरू केले आहे. हिमालयीन गिधाड अफगाणिस्तान, कझाकस्तान, किर्गीस्तान, उझबेकीस्तान, ताजिकिस्तान, तिबेट, नेपाळ, चीनचा पश्चिम भाग, मंगोलिया या भागात आढळते. तसेच इशान्य भारतातही ते आढळते. थंडीच्या हंगामात हे पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात. देशभरात गिधाडांची संख्या कमी होऊ लागताच महाराष्ट्रात गिधाडे दिसेनाशी झाली. त्यामुळे त्यांचा समावेश ‘नष्टप्राय श्रेणी’तील पक्ष्यांच्या यादीत करण्यात आला आहे.

गिधाडाचा बचाव केला त्यावेळी ते अशक्त होते. बचाव केल्यानंतर तात्काळ त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले. गिधाड सापडलेल्या परिसरात बर्डफ्लूची साथ होती. यामुळे खबरदारी म्हणून त्याच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. आता गिधाडाच्या तब्येतीत सुधारणा झाली असून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वन विभागाशी चर्चा सुरू आहे. पवन शर्मा, अध्यक्ष, रेस्क्युइंक असोसिएशन फॉर वेल्फेअर

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weakened himalayan vulture in uran improved after treatment discussions for its release in natural habitat mumbai print news sud 02