मुंबई : शरीर निरोगी व सुदृढ राहण्यासाठी ज्याप्रमाणे संतुलित आहार, व्यायाम, वैद्याक तपासणी आवश्यक असते, तशीच काळजी आपण आपल्या खिशाच्या अर्थात सांपत्तिक स्थितीच्या आरोग्यबाबतही घ्यायला हवी. ती कशी घ्यावी आणि अशा आरोग्य तपासणीची प्रत्यक्ष संधी येत्या बुधवारी सायंकाळी ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ या वार्षिक अंकाच्या प्रकाशनानिमित्त सर्वांसाठी खुली झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पानंतर काही दिवसांतच, नवीन आर्थिक वर्षांसाठी गुंतवणूकदारांना सजग आणि सज्ज करणारा ‘गुंतवणूक-संकल्प’ म्हणून प्रकाशित होत आलेल्या ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’चे आजवर नेहमीच स्वागत होत आले आहे. यंदा या वार्षिक विशेषांकाच्या प्रकाशनाचे हे सलग १२ वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने गुंतवणूकविषयक परिसंवाद आणि उपस्थितांच्या आर्थिक आरोग्य तपासणीचा कार्यक्रम बुधवार, ५ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता, सूर्यवंशी क्षत्रिय सभागृह, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, दादर (प.) येथे योजण्यात आला आहे.

कार्यक्रमाला प्रवेश सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य असेल. खर्च आणि मिळकत यांत मेळ घालून भविष्यासाठी तजवीज म्हणून बचत आणि गुंतवणुकीचा मार्ग अनुसरणे हे प्रत्येकासाठी गरजेचेच बनले आहे. आपल्या खर्चाच्या सवयी, कर्जभार, कुटुंबातील जबाबदाऱ्या पाहता आपल्या आर्थिक आरोग्याची स्थिती नेमकी कोणत्या पातळीवर आहे आणि ती सुधारण्यासाठी काय करता येईल, याची या निमित्ताने उपस्थितांना माहिती करून घेता येईल.

आपल्या आर्थिक नियोजनात पैशाला मोठे बनविणारे गुंतवणुकीचे मार्ग कोणते आणि ते कसे निवडायचे याचे उत्तर वित्तीय नियोजनकार आणि अर्थ-अभ्यासक कौस्तुभ जोशी हे या कार्यक्रमात देतील. शिवाय गुंतवणुकीतून जे कमावले त्या संपत्तीचे स्वकीयांमध्ये विनासायास, विना-तंटा हस्तांतरण व्हावे यासाठी करावे लागणारे ‘इच्छापत्र’ (विल) आणि त्या अंगाने सर्व शंका-कुशंकांचा उलगडा सनदी लेखापाल आणि कर-सल्लागार दीपक टिकेकर हे करतील. यंदाच्या अर्थसंकल्पातील करसवलतीचा दिलासा पाहता, पगारदारांना अधिक पैसा गुंतवणुकीसाठी उपलब्ध होईल. त्या संबंधाने २०२५ मधील गुंतवणुकीचे अवलोकन म्हणून यंदाचा ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’चा अंक निश्चितच मार्गदर्शक ठरेल, तोही या ठिकाणी उपस्थितांना मिळविता येईल.