मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईत कधी कडक ऊन, तर कधी ढगाळ वातावरण अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तापमानाच्या पाऱ्यात सतत चढ- उतार होत आहे. परिणामी, उकाड्यात वाढ झाली. दरम्यान, पुढील एक – दोन दिवस मुंबईतील उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मुंबईत जानेवारीच्या सुरुवातीपासून तापमानात चढ – उतार होत आहेत. पहिल्या आठवड्यात बहुतांश वेळा कमाल तापामानाचा पारा ३५ अंशावर होता. ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानाच्या पाऱ्यात घट झाल्याने रात्रीच्या उकाड्यात वाढ झाली होती. काही वेळेस दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या आसपास राहिल्याने किंचित दिलासा मिळाला होता. दरम्यान, पुन्हा किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे गारवा जाणवत नाही, तसेच दुपारी उन्हाचा चटका लागतो. मुंबईत शनिवारी दिवसभर उकाडा सहन कारावा लागला. पहाटे गारवा नसल्यामुळे त्यात आणखी भर पडली.
दरम्यान, उत्तर भारतातून कमी झालेले थंड वाऱ्याचे प्रवाह आणि ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी ३२.५ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी काही अंशानी कमाल तापमान अधिक नोंदले गेले.
उत्तर भारतातही थंडीचा जोर कमी झाला आहे. पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे ईशान्य अरबी समुद्रापासून दक्षिण राजस्थानपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच उत्तर भारतातही थंडीचा कडाका कमी – अधिक होत आहे. दरम्यान, जानेवारीत मुंबईत थंडी तुलनेने कमी होती. डिसेंबरमध्ये काही प्रमाणात थंडीचा जोर होता. मात्र, जानेवारी महिन्यात किमान आणि कमाल तापमानातही सातत्याने बदल होत असल्याने पहाटे फारसा गारवा जाणवला नाही. याऊलट असह्य उकाडा सहन करावा लागला.