मुंबई : मागील काही दिवस मुंबईतील कमाल आणि किमान तापमानात घट झाल्यामुळे दिवसभर दिलासादायक वातावरण होते. पहाटेचा गारवा आणि संपूर्ण दिवसभर गार वारा असल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळात होता. दरम्यान, पुढील दोन दिवस मुबंईच्या तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे दुपारी उन्हाचा झळा वाढण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत फेब्रुवरी महिन्याच्या सुरुवातीला उत्तरेकडून येणाऱ्या शीत वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने शहर आणि उपनगरात किमान तापमानाचा पारा २० अंशाखाली उतरला आहे. यामुळे संपूर्ण दिवसभर वातावरणात गारवा निर्माण होऊन मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, शुक्रवार ते रविवार या कालावधीत मात्र मुंबईतील तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यावेळी कमाल तापमानाचा पारा ३४ ते ३६ अंशादरम्यान राहील. त्यामुळे या कालादीत दुपारी मुंबईकरांना उन्हाच्या झळा सहन करावा लागणार आहेत. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी ३० अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथील कमाल तापामान सरासरीपेक्षा ३.५ अंशानी अधिक होते. किमान तापामानाचा पारा जरी २० अंशावर असला तरी दिवसभरातील तापमानामुळे उकाडा सहन करावा लागणार आहे.

राज्यात पुढील चार ते पाच दिवस कोरड्या हवामानासह कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील अनेक भागात गुरुवारी कमाल तापमान ३४ अंशाहून अधिक नोंदले गेले.