मुंबई : भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रसह संपूर्ण भारतभरात फेब्रुवारी महिन्यातील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतातील थंडीच्या दिवसांची संख्या सरासरीपेक्षा कमी राहण्याचा, तसेच पर्जन्यवृष्टी आणि बर्फवृष्टीही सरासरीपेक्षा कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात फेब्रुवारी कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात मुंबईसह संपूर्ण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहून उन्हाच्या झळा जाणवण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात चार – पाच दिवस थंडीची लाट सदृशस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरात ला – निना सक्रीय आहे पण, कमजोर स्थितीत आहे. एप्रिलअखेरपर्यंत तो सक्रीय राहून, त्यानंतर तो तटस्थ अवस्थेत जाईल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

२०२५ ची सुरुवात उष्ण महिन्याने

जानेवारी महिन्यात देशाचे सरासरी कमाल तापमान २४.६१ अंश सेल्सिअस असते. यंदाच्या जानेवारीत २५.४५ अंश सेल्सिअस होते. कमाल तापमान सरासरी ११.४६ अंश सेल्सिअस असते, ते १२.५१ अंश सेल्सिअस होते. जानेवारी महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा ०.८५ अंश सेल्सिअसने जास्त होते, तर कमाल तापमान १.०५ अंश सेल्सिअसने जास्त होते. १९०१ ते २०२५ या काळातील नोंदीनुसार यंदाचा जानेवारी पाचव्या क्रमांकाचा उष्ण महिना ठरला आहे. १९११ च्या जानेवारीत आजवरच्या उच्चांकी १२.६८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती.

गहू, फळबागांना फटका ?

देशभरात फेब्रुवारी महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने गहू उत्पादनाचा प्रमुख पट्टा असलेला पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गव्हासह हरभरा, मोहरी आणि अन्य कडधान्यांना उष्णतेचा फटका बसण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील फळबागांनाही उन्हाच्या झळांचा फटका बसण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने द्राक्ष, डाळिंब, संत्रा, मोसंबी पिकांना फटका बसू शकतो.

उत्तर महाराष्ट्रात थंडी शक्य

हवामान विभागाने फेब्रुवारी महिन्यात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त केला असला तरीही राज्यातील थंडी संपली असे म्हणता येणार नाही. फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरावड्यात उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात थंडीचे काही दिवस असू शकतील, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weather forecast prediction about summer heat and cold in february across maharashtra mumbai print news asj