मुंबई : शहर आणि उपनगरांमध्ये मंगळवार, २२ एप्रिल रोजी उष्ण आणि दमट वातावरणाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या २४ तासांत शहरातील तापमानात वाढ होऊन कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. यासोबतच आर्द्रतेची पातळीही वाढलेली राहणार असल्यामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार आहे.

असह्य उकाडा

गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. तापमानाचा पारा कमी असला तरी वाढत्या आर्द्रतेने नकोसे केले आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत मंगळवारी दिवसभरात सूर्यप्रकाश तीव्र असणार असून, आकाश काही प्रमाणात ढगाळ राहील. दुपारी आणि सायंकाळी उकाडा अधिक जाणवेल. आर्द्रतेची पातळी ७० टक्क्यांपेक्षा अधिक राहण्याची शक्यता असून, त्यामुळे प्रत्यक्षात तापमान कमी असले तरी ते अधिक असल्याची जाणीव होईल.

मागील काही दिवसांपासून मुंबईतील तापमानात घट झाली आहे. कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदले जात आहे. यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, पुढील एक-दोन दिवस मुंबईच्या तापमानात वाढ होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस पर्यंत राहील. यामुळे मुंबईकरांना उन्हाचा चटका सहन करावा लागणार आहे.

दरम्यान, उष्णतेचा आणि दमट हवामानाचा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. विशेषतः लहान मुले, वयोवृद्ध, गरोदर महिला आणि श्वसन विकार असणाऱ्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. उकाड्यामुळे निर्जलीकरण, घाम येणं, थकवा आणि चक्कर येण्याची तक्रार वाढू शकते.

ठाणे, पालघर आणि रायगडलाही इशारा

मुंबईबरोबरच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या भागातही कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. ठाणे आणि रायगड येथे सलग दोन दिवस म्हणजेच मंगळवार व बुधवार उष्ण व दमट वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

विदर्भात उन्हाची तीव्रता अधिक आहे. गेल्या तीन दिवसांत तापमानाच्या पाऱ्याने ४० अंश सेल्सिअसवरून ४५ अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली आहे. अशातच आता विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, नागपूर या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. रविवारी विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये पारा ४४ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचला होता.

उष्णतेची लाट का?

मध्य प्रदेशापासून विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.यामुळे राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. तर काही भागात अंशतः ढगाळ वातावरण आहे. यामुळे काही भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

विदर्भ देशात उष्ण

रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशातील सर्वांत उष्ण दहा शहरांमध्ये महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भातील सहा शहरांचा समावेश आहे. नागपूर येथे देशातील उच्चांकी ४४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, ब्रह्मपुरी ही शहरे उष्ण ठरली आहेत. राजस्थानातील कोटा, मध्य प्रदेशातील शिवपुरी, सिधी, तेलंगणातील अदिलाबाद या पहिल्या दहा उष्ण शहरात समावेश होता.

हवामान विभागाचे आवाहन

  • शक्य असल्यास दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर जाणे टाळा
  • पुरेसे पाणी प्या.
  • हलका, सुती कपड्यांचा वापर करावा.
  • थेट सूर्यप्रकाशात जाण्यापूर्वी टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.
  • उन्हात काम करणाऱ्यांनी १२ ते ३ या वेळेत विश्रांती घ्यावी