नेमबाजी या खेळात स्वयंस्फूर्तीने यश मिळवून, तो घराघरांत पोहोचविणाऱ्या आणि ‘राजीव गांधी खेलरत्न’ हा देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मिळवणाऱ्या, ‘महाराष्ट्राची सुवर्णकन्या’ अंजली भागवत यांच्या कारकीर्दीचा दूरचित्रसंवादात्मक वेध आज, शुक्रवारी, २४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता ‘लोकसत्ता सहज बोलता बोलता’ या उपक्रमातून घेतला जाणार आहे.

एक खेळाडू म्हणून घडत असताना, शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक कणखरपणाही अत्यंत निर्णायक ठरतो, हे अंजली भागवत यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. कोविडसारख्या कसोटीच्या काळामध्ये खेळाडू म्हणूनच नव्हे, तर एकूणच जगण्याची उमेद कशी कायम ठेवावी या विषयावरील त्यांचे मार्गदर्शन विशेषत युवा पिढीसाठी मौलिक ठरेल. कारण प्रतिकूल परिस्थितीला हार न जाता संघर्ष करत जिंकत राहण्याची सवय हेच त्यांच्या प्रदीर्घ, सोनेरी कारकीर्दीचे वैशिष्टय़ आहे.  नव्वदच्या दशकात भारतात क्रिकेट सोडून अन्य खेळांकडे क्रीडाप्रेमींचा ओढा कमी होता. मात्र त्या काळात अंजली यांनी नेमबाजीसारख्या कठीण खेळात घवघवीत यश मिळवून दाखवले. अंजली यांच्याकडून प्रेरणा घेत अनेक युवक-युवती या खेळात कारकीर्द करण्यासाठी पुढे आल्या आहेत.  आंतरराष्ट्रीय नेमबाजीतून निवृत्त झाल्यानंतर एक प्रशिक्षक म्हणून अंजली या विशेष प्रभाव पाडत आहे. पुण्यात स्थायिक झालेल्या अंजली यांनी त्यांच्या घरामध्येच १० मीटर रेंज तयार केली आहे. याशिवाय ‘लोकसत्ता’सह अनेक नियतकालिकांमध्ये नियमित विश्लेषणात्मक लेखन, क्रीडाविषयक चर्चासंवादांमध्ये सहभाग हीदेखील त्यांची स्वतंत्र ओळख आहे.

सर्वोच्च सन्मान..

‘खेलरत्न’ या भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने २००३मध्ये अंजली यांचा गौरव करण्यात आला आहे.  त्याआधी २०००मध्ये अर्जुन पुरस्काराने, तर १९९२मध्ये राज्यातील शिवछत्रपती पुरस्कारानेही त्यांचा गौरव झाला आहे

सहभागासाठी : https://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_24July येथे नोंदणी आवश्यक.