संसदेवर हल्ल्यातील मुख्य आरोपी असलेल्या अफझल गुरूला फाशी देण्याच्या निर्णयाचे शिवसेना-भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी स्वागत केले आहे. फाशी देण्यास एवढी वर्षे उशीर केल्याबद्दलही या राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे.
लोकभावना लक्षात घेऊन अखेर अफझल गुरुला फाशी दिल्याबद्दल शिवसेनेने समाधान व्यक्त केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवातीपासून देशद्रोही अफझलला तत्काळ फासावर लटकविण्याची मागणी केली होती, असे सांगून सेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून प्रणवकुमार मुखर्जी हे बाळासाहेबांना भेटले त्यावेळी त्यांनी कसाब व अफजलच्या फाशीची मागणी केली होती. या फाशीसाठी आम्ही राष्ट्रपतींचे अभिनंदन करतो, असेही राऊत म्हणाले. संसदेवरील हल्ला हा देशाच्या सार्वभौमत्वावरील हल्ला असल्याने यातील आरोपींना फाशी हेच उत्तर असल्याचे सांगून भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी अफझलच्या फाशीबाबत समाधान व्यक्त केले. खरेतर सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा दिल्यानंतर त्याला तात्काळ फासवर लटकावयाला हवे होते असेही मुंडे म्हणाले. विधासभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी फाशीचे स्वागत केले आहे. उशीरा का होईन सरकारने एक चांगले काम केले अशी प्रतिक्रिया  मनसेचे गटनेते व आमदार बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली. संसदेवरील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या नातेवाईकांनी त्यांची वीरपदके परत केल्यानंतर अफझलला फाशी दिली ही सरकारची नामुष्की असल्याचे मत हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेने मांडले आहे. इराकचा सद्दाम हुसेन आणि ओसामा बिन लादेन यांना अमेरिकेने ज्या तत्परतेने शिक्षा दिली तशी शिक्षा सरकारने दिली असती तर या हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांना खरी श्रद्धांजली ठरली असती. दुर्देवाने सरकार अफजल गुरुला बारा वर्षे जनतेच्या पैशाने पोसत राहिले. आता लोकभावनेचा उद्रेक होऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर फाशी दिल्याचे सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी सांगितले.

Story img Loader