ठाणे शहरात कोपीनेश्वर सांस्कृतिक न्यासने दरवर्षीप्रमाणे यंदाही नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन केले असून यंदाची यात्रा दुष्काळग्रस्तांसाठी निधीसंकलन, स्वामी विवेकानंदांची १५० वी जयंती आणि महिला सक्षमीकरण या विषयांवर आधारित अशी असणार आहे.
यंदा ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा.कृ.सोमण यात्रेच्या स्वागताध्यक्षपदी आहेत. तसेच डॉ. अश्विनी बापट निमंत्रक आणि प्रसाद दाते सहनिमंत्रक आहेत.
यात्रेमध्ये शहराच्या विविध भागांत लावण्यात येणारे झेंडे, तसेच रांगोळी, पोस्टर, बग्गी, फटाके यांसारख्या विविध गोष्टींवर होणाऱ्या खर्चात कपात करुन शिल्लक रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी राखून ठेवली जाणर आहे. स्वामी विवेकानंदांच्या १५० जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या विचारांचा प्रसार यात्रेच्या माध्यमातून केला जाणार आहे. तसेच देशभर महिलांवर वाढत चाललेल्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन स्त्री सन्मान, स्त्रीसुरक्षा आणि स्त्री जागृतीचा संदेश यावेळी देण्यात येणार आहे. यावर्षी अधिकाधिक महिला संस्था, महिला बचतगट, संघटना आणि भजनी मंडळांचा यात्रेत सहभाग असणार आहे.
स्वागतयात्रेच्या पूर्वसंध्येला यंदाही येथील मासूंदा तलाव परिसरात पणत्या लावून आणि आकाशात दिवे सोडून दिपोत्सव साजरा केला जाणार आहे. अधिकाधिक ठाणेकरांना यात्रेत सहभागी होण्याचे कोपीनेश्वर सांस्कृतिक न्यासचे अध्यक्ष मा.य.गोखले यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा