मुंबई : राज्यभरातील बहुतांश ठिकाणी तापमान घटले असून पहाटे गुलाबी थंडीचा अनुभव नागरिक घेत आहेत. राज्यात १० ते १५ अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यात पहिल्या पश्चिमी झंझावाताने उत्तर भारतात प्रवेश केल्यानंतर उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला. परिणामी, राज्यात थंडीची लाट आली. मात्र, त्यानंतर राज्यातील थंडीही कमी होऊन तापमानात हळूहळू वाढ झाली होती. आता दुसऱ्या पश्चिमी झंझावातामुळे उत्तर भारतात थंडीची लाट आली असून राज्यातही थंडी पडली आहे.
राज्यात रविवारी नाशिक येथे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. नाशिक येथे किमान तापमान १० अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. तसेच, औरंगाबाद १०.४, पुणे १२.५ नांदेड १६.४, सातारा १४.९, जळगाव ११, सांगली १७.३, मालेगाव १७, परभरणी १६.५, बारामती १३.८, डहाणू १७.३, सोलापूर १७.६, उदगीर १६.५, रत्नागिरी २०, माथेरान १५.२, ठाणे २२, उस्मानाबाद १६, अकोला १५.९, अमरावती १५.५, बुलढाणा १४.२, ब्रम्हापुरी १५.४, गडचिरोली १३.४, गोंदिया १४.५, नागपूर १५.६, वर्धा १५, वाशिम १५, यवतमाळ १५.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले.
हेही वाचा >>> आशीष शेलार यांच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न; स्वीय साहाय्यकाकडून तक्रार दाखल
मुंबईत गारठा
नाताळदरम्यान हुडहुडी भरवणारी थंडी दोन दिवसात गायब होऊन पुन्हा तीव्र उन्हाच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागल्या. गेल्या गुरुवारी मुंबईतील कमाल तापमान ३३ अंशांहून अधिक वाढल्याने घामाच्या धारेने नागरिकांना हैराण केले. मात्र, आता मुंबईकरांना नववर्षाच्या सुरुवातीलाच थंडगार वातावरणाचा अनुभव घेता येत आहे. रविवारी सकाळी ८.३० वाजता सांताक्रूझ येथील किमान तापमान १५.६ अंश सेल्सिअस, कुलाबा येथील १८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान विभागाने केली.