विहिरीतील पाण्याचा वापर केला जात असल्याचा बॉम्बे जिमखान्याचा दावा

मुंबई : दक्षिण मुंबईतील खचू लागलेल्या पदपाथाची दुरुस्ती करताना रस्त्याखाली गायब झालेल्या शतकापूर्वीच्या एका विहिरीचा बुधवारी पालिकेला शोध लागला. सुमारे ३५ इंच व्यासाच्या या विहिरीची पालिकेच्या अभिलेखावर नोंदच नाही. १०० वर्षांहून अधिक काळ या विहिरीतील पाण्याचा वापर करीत असल्याचा दावा ‘बॉम्बे जिमखान्या’कडून करण्यात आला आहे. या विहिरीची नोंद पालिका दफ्तरी असलेल्या अभिलेखात करावी, अशी मागणी जिमखान्याकडून करण्यात आली आहे. पालिकेने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही.

दक्षिण मुंबईमधील महात्मा गांधी मार्गावर आझाद मैदानाच्या एका कोपऱ्यात बॉम्बे जिमखाना आहे. जिमखान्याच्या एका टोकाला अध्यक्षांचा बंगला आहे. जिमखान्यालगतच्या पदपथाचा वापर सभासदांची वाहने उभी करण्यासाठी होत असे. मात्र, पालिकेने हरकत घेऊन पदपथ मोकळा केला. गेल्या काही दिवसांपासून या पदपथाचा काही भाग खचत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाने पदपथाची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेत खोदकाम सुरू केले. खोदकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदपथाखाली पोकळ जागा असल्याचे जाणवले. पेव्हरब्लॉकच्या खालील सिमेंट काँक्रीटचा कोबा तोडल्यानंतर खाली भलीमोठ्ठी विहीर आढळली. या विहिरीची पालिकेतील अभिलेखावर नोंदच नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. तूर्तास पदपथावरील विहिरीचा भाग मार्ग रोधक बसवून बंदीस्त करण्यात आला आहे.

या विहिरीतील पाण्याचा गेल्या १०० वर्षांपूर्वीपासून आपण वापर करत असल्याचा दावा बॉम्बे जिमखान्याने पत्राद्वारे पालिकेकडे केला आहे. मे २००८ मध्ये पालिकेच्या अभियंत्याने या विहिरीची पाहणीही केली होती. त्यावेळी झालेला पत्रव्यवहार बॉम्बे जिमखान्याने पालिकेला सादर केला. जिमखान्यातील तरणतलाव आणि मैदानावरील हिरवळीसाठी या विहिरीतील पाण्याचा वापर करण्यात येतो. या विहिरीची पालिकेच्या अभिलेखावर नोंद करावी, अशी विनंती बॉम्बे जिमखान्याकडून करण्यात आली आहे.

जिमखान्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आझाद मैदानाची जागा भाडेपट्टय़ाने देण्यात आली आहे. मात्र विहीर पालिकेच्या हद्दीत आहे. त्यामुळे अद्याप पालिकेने कोणताच निर्णय घेतलेला नाही. मात्र तलावांतील पाण्याची पातळी खालावत असतानाच पदपथाखाली गडब झालेली विहीर सापडल्यामुळे पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी पाणी उपलब्ध करण्याचा मार्ग पालिकेला सापडला आहे.

विहिरीचा भाग बंदिस्त करण्यात आला आहे. बॉम्बे जिमखान्याबरोबर भाडेपट्टा करार करताना त्यात विहिरीचा उल्लेख होता का याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी करण्यात येत आहे.

-किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, ‘ए’ विभाग