मुंबईमध्ये घराच्या किमती गगनाला भिडलेल्या असतात हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरात एका घराची किंमत ५ कोटी ते १० कोटीपर्यंत असेल तरीही ठीक. पण एका नामांकित व्यक्तीने घेतलेल्या खरेदी केलेल्या घराची किंमत तब्बल १२७.४९ कोटी रुपये आहे. आता इतके महागडे घर कोणी घेतले असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. तर हे घर वेल्स्पून इंडिया कंपनीचे संचालक असलेल्या राजेश मंडवेवाला यांनी खरेदी केले आहे. प्रभादेवी भागात असणाऱ्या या घराच्या इमारतीचे नाव २५-साऊथ असे आहे. २० हजार ९८९ क्वेअर फूट इतके या घराचे क्षेत्रफळ आहे. या घराची किंमत इतकी जास्त असण्याचे कारण म्हणजे ते समुद्र किनाऱ्याच्या जवळ आहे.
४५ ते ४७ अशा तीन मजल्यांच्या या अलिशान घराला १४ कार पार्क करता येतील एवढे मोठे पार्किंगही देण्यात आले आहे. या इमारतीचे काम अद्याप सुरु असून २०२३ पर्यंत ते पूर्ण होईल असे सांगण्यात आले आहे. प्रत्येकाला घराची नोंदणी करताना मुद्रांक शुल्क आणि वस्तू सेवाकर भरावा लागतो. त्याचप्रमाणे या घराचा मुद्रांक शुल्क ६.३७ कोटींपर्यंत गेले आहे. त्यामुळे हे सगळे धरुन या घराची किंमत दीडशे कोटींच्या घरात गेली आहे. हा प्रकल्प ‘वाधवा ग्रुप’ आणि हबटाऊन यांनी एकत्रितरित्या केला असून त्यांनी ग्राहकांना आपल्या गरजेनुसार घरे बांधून दिली आहेत. या इमारतीतील सर्वात कमी किंमतीचे घर ८ कोटी ९० लाखांचे असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकल्प ५ एकरात पसरलेला असल्याचेही सांगण्यात आले आहे.